महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक वादळी आणि गारपिटीचा पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यात पुढच्या 24 तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागातही पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमानात वाढ होत असून, उन्हाच्या झळा असह्य ठरत आहेत. राज्यात उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर ब्रह्मपूरी, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे येथे तापमान 41 अंशांवर होते. उर्वरीत राज्यात कमाल तापमान 34 ते 40 अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
उत्तर अंतर्गत कर्नाटक पासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.
राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 36.1 (19.2), जळगाव 41.0 (26.3), धुळे 41.0 (19.0), कोल्हापूर 36.2 (24.8), महाबळेश्वर 31.1 (17.4), नाशिक 37.3 (18.3), निफाड 39.2(16.1), सांगली 37.2 (24.1), सातारा 36.1 (20.0), सोलापूर 40.3 (24.9), सांताक्रूझ 34.1 (25.4), डहाणू 34.0 (22.8), रत्नागिरी 33.9 (24.4), छत्रपती संभाजीनगर 39.0 (23.4), नांदेड 39.2 (26.0), परभणी 39.5 (26.3), अकोला 41.8 (26.0), अमरावती 41.4(23.5), बुलढाणा 37.5(25.6), ब्रह्मपूरी 41.7 (23.6), चंद्रपूर 41.6 (24.8), गडचिरोली 98.0(22.6), गोंदिया 40.8 (22.0), नागपूर 39.7 (22.2), वर्धा 41.6(25.5), वाशीम 40.2 (25.8), यवतमाळ 40.5(24.7).