धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार ४२८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) बोनस देण्याचा (Paddy Bonus) निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार ४२८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर म्हणजे तब्बल तीन महिन्यांनंतर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धानासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने मदतीची रक्कम दुप्पट करून हेक्टरची मर्यादाही दोनवरून तीन केली. याचा फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सोयाबीन, तुरीसह काही महत्त्वाची पिके प्रशासनाने कोरडवाहू दाखविल्याने त्यांना प्रत्यक्ष मदत कमी मिळाली.
ही मदत कशी आणि कोणाला द्यायची, यावर मंत्रालयस्तरावर बराच खल झाला. अखेर २४ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याचा आदेश काढण्यात आला. नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
३७१७ शेतकऱ्यांची माहिती अंतिम
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माहिती गोळा करण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनच बोमस थेट शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्यास बराच वेळ लागला. त्यानंतर पोर्टलने अडचण निर्माण केली. काही केंद्रांची माहिती पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात १० हजार ४२८ शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळेल. आतापर्यंत ३७१७ शेतकऱ्यांची माहिती अंतिम झाली आहे
लाभासाठी नोंदणी आवश्यक
धान विक्री केली असो वा नसो बोनसचा लाभ देण्यासाठी ‘नोंदणीकृत शेतकरी’ हा निकष ठेवला आहे. मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर त्याची नोंदणी असणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत शेतकऱ्याने केंद्रावर धान विक्री करणे बंधनकारक केले नाही. संबंधित शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो, तरीही त्याला लाभ दिला जाईल.
source:-agrowon