पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीची मदत…

abdul satar

वकाळी पावसासोबतच झालेल्या गारपीटीमुळे राज्यातील सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीची २४ तासांत कृषी आणि महसूलचे अधिकारी संयुक्त पंचनामे पूर्ण करतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.


हिमायतबाग येथील कृषी विद्यापीठाच्या विज्ञानभवन येथे मतदार संघातील कामांसंदर्भात कृषीमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, अतिवृष्टी, संततधार, परतीचा पाऊस आणि आता अवकाळी, गारपीट अशा प्रकारे सहा महिन्यांत चाैथ्यांदा शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी आणि गारपीटीमुळे राज्यात सुमारे ४३ हजार हेक्टरवरील पिकांचे तर मराठवाड्यातील ११ हजार १६६ हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ हजार ९५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला नाही, त्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले आहे. आतापर्यंत ७० टक्के पंचनामे झाले आहेत. २४ तासांत उर्वरित पंचनामे पूर्ण होतील आणि पुढील १० दिवसांत बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे त्यांनी नमूद केले.


🔹एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत देऊ : गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. तशीच मदत गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन देईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. प्राप्त होणारे पंचनामे वस्तुनिष्ठ आहेत अथवा नाहीत, याबाबतची पडताळणी कृषी आयुक्त आणि महसूल आयुक्त संयुक्तपणे २४ तासांत करतील. यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही शासनाकडून होईल.

source:- lokmat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *