वर्धा जिल्ह्यात अडीच हजार शेतकऱ्यांना तुषार सिंचनाचा लाभ
हवामान बदलामुळे (Climate Change) उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्यासोबतच किफायतशीर शेती व्यवसायास साहाय्य करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २ हजार ६८८ शेतकऱ्यांना तुषार सिंचन संच (Irrigation Set) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ४ कोटी ७६ लाख रुपये वितरित केले.
राज्यात १५ जिल्ह्यातील ५ हजार १४२ गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. लघुपाट बंधाराचे सरासरी क्षेत्र सुमारे ५ हजार हेक्टर एवढे असून यामध्ये सरासरी सात ते आठ गावांचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या उद्देशाप्रमाणे जिल्ह्यातील निवडलेल्या १२५ गावांमध्ये शेती शाळेचे आयोजन करण्यात आले, तसेच या शेती शाळेद्वारे संबंधित गावातील शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जसे की रुंद सरी वरंबा तसेच शून्य मशागत इत्यादी सारखे हवामान अनुकूल तंत्रज्ञान शिकवण्यात आले आहे.
या हवामान अनुकूल तंत्रज्ञांचा वापर करण्यासाठी वैयक्तिक लाभाअंतर्गत ठिबक, तुषार, पॉलिहाऊस, शेततळे, वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग, विहीर पुनर्भरण, नाडेफ, शेडनेट, बिजोत्पादन अशा योजनांवर साठ ते शंभर टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.
काढणीपश्चात व्यवस्थापन या घटकांतर्गत महिला बचत गट, शेतकरी बचत गट तसेच उत्पादक कंपनी यांना शेतीवर आधारित व्यवसायासाठी ६० टक्के अनुदान दिले जाते. सामूहिक लाभांतर्गत जुन्या मृदा जलसंधारणाची कामे शंभर टक्के अनुदानावर करण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात २१ कोटींचा खर्च
शेतमाल मूल्य साखळी बळकटीकरण या घटकांतर्गत ४४ शेतकरी महिला बचत गट, उत्पादक कंपनी यांना ४ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
तसेच प्रकल्पातील गावांमध्ये मृद व जलसंधारण या घटकांतर्गत ५ कोटी ६४ लाख इतका लाभ देण्यात आलेला आहे. प्रकल्पांतर्गत वर्धा जिल्ह्यांमध्ये एकूण २१ कोटी ७ लाख इतका खर्च झालेला आहे.
source:- agrowon