सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

पारंपारिक शेतीतून चरितार्थ भागविणे शक्‍य नसल्याने त्यास ब्रॉयलर कुक्कुटपालनाची जोड पांगरा (ता.पैठण) येथील क्षीरसागर दाम्पत्याने दिली आहे. ५०० पक्ष्यांपासून सुरू केलेला व्यवसाय ७० हजार पक्षी संगोपनापर्यंत पोचला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पांगरा (ता.पैठण) येथील सौ. सुनंदाताई व शिवाजीराव क्षीरसागर या दाम्पत्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती. जमीन हलकी व कोरडवाहू प्रकारची. त्यामुळे शेतीतील उत्पन्नाच्या आधारे कुटुंबाचा चरितार्थ भागविणे शक्य नव्हते.

क्षीरसागर दाम्पत्याने १९९२-९३ मध्ये शेतीला पूरक म्हणून ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry business) करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत साध्या शेडमध्ये ५०० पक्ष्यांची पहिली बॅच घेतली. हळूहळू मिळालेल्या यशातून व्यवसायाचा विस्तार होत गेला.

सध्या त्यांच्याकडे ३० बाय ५०० फूट आकाराची ४ कुक्कुटपालन शेड आहेत. त्यात ब्रॉयलर पक्ष्यांच्या प्रति वर्ष ८ ते ९ बॅच घेतल्या जातात. एका शेडमध्ये १५ ते २० हजारापर्यंत पक्षी संगोपन होते. चारही शेडमधून एकावेळी प्रतिबॅच ६० ते ७० हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. व्यवसायात मुलगा शुभम यांचीही त्यांना मोठी मदत मिळते.

पोल्ट्री उद्योगातून शेतीविस्तार

पोल्ट्री व्यवसायात सचोटी व सातत्य राखत मिळालेल्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण आणि शेतीचा विस्तार करणे क्षीरसागर दाम्पत्याला शक्य झाले. सध्या त्यांच्याकडे जवळपास ३१ एकर शेती आहे.

त्यापैकी १० एकरांत सीताफळात सागवानाचे आंतरपीक तर आणखी ५ एकरांत सागवानाची लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये कपाशी, गहू, हरभरा इत्यादी हंगामनिहाय पिकांची लागवड केली जाते.

मत्स्यपालन, मोत्याच्या शेतीचा प्रयोग

शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून २०१८ मध्ये ११० बाय ११० फुटांचे शेततळे उभारले. त्यात मत्स्यपालनाचा प्रयोग केला. परंतु, त्यात यश मिळाले नाही. मात्र, ते खचून गेले नाहीत. २०१९ मध्ये स्वखर्चाने २०० बाय २०० फूट आकाराचे विस्तीर्ण शेततळे उभारले.

त्यात २०२१-२२ मध्ये राहू, कटला, मृगल या माशांचे ५० हजार मत्स्यबीज सोडले. त्यासोबतच शेततळ्यात मोत्याच्या शेतीचा प्रयोगही केला.

कुटुंबाची साथ

पोल्ट्री शेडमधील सर्व कामांची जबाबदारी पत्नी सुनंदा आणि मुलगा शुभम हे दोघे सांभाळतात. तर शिवाजीराव हे पोल्ट्रीसाठी लागणारे साहित्य, खाद्य आणि पक्षी विक्रीची जबाबदारी सांभाळतात.

साधारणत: ४५ ते ५० दिवसांच्या आत पक्ष्यांची विक्री करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांसोबत बाजारातील मांसल कोंबड्यांच्या आवकेचा अभ्यास शिवाजीराव करतात.

बाजारपेठ, हवामान, सण-समारंभ, श्रावण महिना, तापमानातील चढउतार आदींचा अभ्यास करून प्रत्येक बॅचमधील पक्षी संख्या ठरविले जाते.

शेतकऱ्यांकडून मका खरेदी

पोल्ट्रीसाठी महिन्याला साधारण १०० ते १५० टन खाद्य लागते. त्यात ७० टक्‍के मका, २० टक्‍के सोया पेंड व १० टक्‍के व्हिटॅमिन, खनिज मिश्रण आदींचा वापर केला जातो. मका सर्वाधिक लागते. त्यासाठी परिसरातील १५० ते २०० शेतकऱ्यांकडून ३० हजार क्‍विंटल मक्याची दरवर्षी खरेदी केली जाते.

मका खरेदी करताना शेतकऱ्यांना त्याच दिवशी पैसे दिले जातात. किंवा मका आगाऊ घेऊन पैशांची गरज भासेल तेव्हा त्या दिवशीच्या बाजारभावानुसार मक्याचे पैसे घेण्याचा पर्यायही त्यांनी शेतकऱ्यांना दिला जातो.

त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पैसा उपलब्ध होतो तसेच मका साठवणुकीसाठी जागेची अडचणीही येत नसल्याचे, शिवाजीराव सांगतात.

शेडमध्ये स्वयंचलित यंत्रणेचा वापर

चारही शेडमध्ये खाद्य आणि पाणी पुरवठ्यासाठी स्वयंचलित यंत्रणेचा अवलंब केला आहे. ट्रे मधील खाद्य व पाणी संपले, की स्वयंचलित यंत्रणेद्वारे मुख्य टाकीतून खाद्य आणि पाण्याचा पक्ष्यांना गरजेनुसार पुरवठा होतो. याशिवाय शेडमधील ठिबकरूपी पाईपला चोच लावली की, त्यातून पिण्याचे पाणी पक्ष्यांना उपलब्ध होते.

लसीकरण आणि स्वच्छतेवर भर

पक्षी आणल्यानंतर पहिल्या दिवशी प्रतिकारशक्ती वाढीसाठी लसीकरण केले जाते. त्यानंतर ६ व्या दिवशी लासोटा, १२ व्या दिवशी गंबोरो आणि २१ व्या दिवशी लासोटाचा बूस्टर डोस दिला जातो. प्रत्येक बॅच गेल्यानंतर कोंबडीखत काढून शेड स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण केले जाते. शेडमधील फरशी व आतील सर्व भाग फ्लेम गनच्या मदतीने जाळून घेतला जातो.

वर्षाकाठी ५०० ट्रॉली कोंबडीखत

चारही शेडमधून वर्षाला ५०० ट्रॉली तर महिन्याला ४० ते ५० ट्रॉली कोंबडीखत मिळते. त्यापैकी २० ट्रॉली कोंबडीखताचा स्वत:च्या शेतीमध्ये वापर तर उर्वरित खताची ३ हजार रुपये प्रति ट्रॉली प्रमाणे विक्री होते.

ठळक बाबी

– ४ पोल्ट्री शेडची उभारणी.

– एका शेडची पक्षी क्षमता १५ ते १६ हजार पक्षी.

– १ दिवस वयाच्या पक्षाची सरासरी १० ते ५० रुपये दराने खरेदी.

– शेडमध्ये स्वयंचलित यंत्रणेचा वापर.

– संपूर्ण पोल्ट्री परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली.

– प्रति पक्षी २०० ते २५० रुपये उत्पादन खर्च.

– ५० ते १३० रुपये प्रति किलो दराने पक्षी विक्री.

– विक्रीवेळी सरासरी २ ते पावणेतीन किलो वजनाचे पक्षी.

– राज्यातील विविध होलसेल व किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री.

– वर्षभर १६ मजुरांना रोजगार.

source:- agrowon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *