महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याने आल्याचं चांगलं पीक घेऊन लाखो रुपयाची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक करीत आहेत.आल्याची शेती केल्यामुळे एक बारामतीचा (Baramati) शेतकरी (Farmer) मालामाल झाला आहे. बारामती निंबूत गावाचे रहिवासी संभाजीराव काकडे असं त्या शेतकऱ्यांचं नाव आहे. त्यांनी दीड एकरात आल्याच्या पीकाची लागवड (Ginger farming) केली होती. पहिल्यावर्षी त्यांचं मोठ नुकसान झालं. पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्यावर्षी चांगली मेहनत आणि काळजी घेतल्यामुळे १५ लाख रुपयांचा त्यांना फायदा झाला आहे.
निवृत्तीनंतर केली उत्तम शेती.
शेतकरी संभाजीराव काकडे सोमेश्वर महाविद्यालयात कार्यरत होते. दोन वर्षापुर्वी ते तिथून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी असलेल्या शेतीकडं अधिक लक्ष दिलं. त्याचबरोबर शेताआत आल्याची लागवड केली. पहिल्यावर्षी त्यांना मोठा फटका सहन करावा लागला. १० हजार रुपयांनी असा प्रति टनाला भाव मिळाला. परंतु पहिल्या प्रयत्नात त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्यांदा त्यांनी पिकाची अधिक काळजी घेतली. त्यामुळे यावर्षी त्यांच्या आल्याच्या पिकाला ६६ हजार रुपये प्रति टन पैसे मिळाले आहेत.
१५ लाखापेक्षा अधिक फायदा
संभाजीराव यांनी सांगितले की, पुर्वी तिथं आम्ही उसाची शेती करीत होतो. पहिल्यावर्षी त्यांना एका एकराला तीन लाख रुपयांचा तोटा झाला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यावर्षी सहा लाख रुपये खर्चे करुन आल्याची लागवड केली. अधिक मेहनत आणि पिकांची काळजी घेतल्यामुळे त्यांनी आल्याचं तीन टनाचं उत्पादन काढलं. प्रत्येक टनाला त्यांना ६६ हजार रुपये मिळाले. त्यांना १९ लाख रुपये मिळाले आहेत. शेतीसाठी झालेला सगळा खर्चे काढून त्यांना १५ लाख रुपयांचा फायदा झाला आहे.
काकडे परिवाराने शेती करीत असताना पीक चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. त्याचबरोबर यावर्षी त्यांनी फक्त १० टक्के रासायनिक खते वापरली आहेत. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी त्यांनी 40 ट्रॉली शेणखत, 8 ट्रॉली राख, 300 पोती शेणखत, 8 ट्रॉली प्रेस मड आणि त्यात सोडलेले जिवाणू गोळा केले. तो अडीच महिने कुजला. आले पिकाला खताचा मोठा फायदा झाला आहे. पुढील वर्षी शंभर टक्के सेंद्रिय खताचा वापर करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
source:- tv9marathi