Aeroponics technology : एरोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे, जी हवा आणि मातीशिवाय बागायती पिके वाढवण्यासाठी वापरली जाते.
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), बंगळुरू येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था (IIHR) आणि कालीकटमधील भारतीय मसाला संशोधन संस्थेने (IISR) उच्च मूल्याच्या पिकांसाठी इनडोअर एरोपोनिक्सला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या टेक्नॉलॉजीमुळे कमी वेळेत चांगले उत्पादन मिळेल, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल, असा विश्वास कृषी शास्त्रज्ञांचा आहे. दरम्यान, एरोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे, जी हवा आणि मातीशिवाय बागायती पिके वाढवण्यासाठी वापरली जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर सर्व काही योजनेनुसार चालले तर तुम्ही लवकरच पॉली हाऊसमध्ये मातीशिवाय भाज्या , काही फळे, मसाले आणि अगदी फुलांचे देखील उत्पादन घेऊ शकता. विशेष बाब म्हणजे धुके फवारणी तंत्राचा वापर करून झाडे हवेत लटकवता येतात आणि आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करता येतो. दरम्यान, यासंदर्भात भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेकडून ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे.
भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थचे शास्त्रज्ञ नंदिशा पी यांच्या मते, काही फळे,भाज्या
(ज्या आकाराने लहान असतात), फुले आणि अगदी मसाले देखील एरोपोनिक्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने पिकवता येतात. या पद्धतीत झाडे लटकत राहिल्याने या झाडांची मुळे दिसू लागतात. ते म्हणाले, “आम्ही हे पॉली हाऊस नावाच्या संरक्षित क्षेत्रात वाढवू शकतो. आवश्यक पोषक तत्वांची फवारणी करण्यासाठी सेन्सर-आधारित धुके फवारणी टेक्नॉलॉजी वापरली जाते. तसेच, आगामी काळात ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.”
टोमॅटो, पुदीना आणि तुळस यांचा समावेश:-
एरोपोनिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते या टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत. यासाठी कमी पाणी लागते आणि त्यामुळे हा अपव्यय टाळता येतो. पोषक तत्वे देखील वाया न घालवता वापरता येतात. आणखी एक मोठा फायदा म्हणजे झाडांच्या सामान्य वाढीच्या कालावधीच्या तुलनेत झाडे जलद आणि चांगली वाढतात. एरोपोनिक्स वापरून वाढवता येणार्या काही लोकप्रिय वनस्पतींमध्ये स्ट्रॉबेरी, टोमॅटो, पुदीना आणि तुळस यांचा समावेश होतो.
आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा पाण्याद्वारे केला जातो:-
याआधी भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने मातीविरहित शेती टेक्नॉलॉजी विकसित केली होती, जिथे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्त्वे, जसे फॉस्फरस, पोटॅशियम आणि नायट्रोजनला कोको-पीटमध्ये जोडली जातात. याचा वापर टेरेस गार्डनिंगपासून ते अनेक प्रकारच्या शेतात केला जाऊ शकतो. या टेक्नॉलॉजीचा वापर याठिकाणीही केला जातो, जिथे वनस्पतींची लागवड पाण्यात आणि मातीशिवाय केली जाते. आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा पाण्याद्वारे केला जातो.
Source:- Lokmat