माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वालाच्या शेतीबरोबर तयार केलेले कलिंगडाचे पीक तयार झाले आहे.
कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते तसेच गारवादेखील मिळतो. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच कलिंगडाला मागणी (Watermelon Demand) वाढत असते.
मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) सध्या रोहा, माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या कलिंगडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून चवदार कलिंगडांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
रोहा तालुक्यातील घोसाळे, सुतारवाडी या डोंगराळ भागासह कुंडलिका नदीच्या कालव्यावर किल्ला, कोलाड, तळघर या भागातील शेतीही कलिंगडाच्या लागवडीने बहरली आहे.
याचबरोबर माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वालाच्या शेतीबरोबर तयार केलेले कलिंगडाचे पीक तयार झाले आहे. रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनीचे रोहा तालुका संघटक अजय लाटकर यांच्या मते रायगडमध्ये तयार होणाऱ्या कलिंगडाची चव गोड असते.
रासायनिक खताचा वापर जात नसल्याने आरोग्यास हे फळ अधिक चांगले आहे. कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असल्याने हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. तसेच जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ असल्याने कॅलरीचे प्रमाण कमी असते.
त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या कलिंगडाला सध्या मागणी वाढली आहे. दरम्यान, उन्हाळा सुरू झाल्याने वाशीच्या घाऊक बाजारात कलिंगडची आवक वाढली आहे.
बाजारात दररोज ४० ते ४५ गाड्या येत असल्याने घाऊक बाजारात ८ ते १० रुपये किलोने कलिंगड विकले जात आहेत. सांगली, सोलापूर, गुलबर्गा, येथून मोठी कलिंगडाची आवक होत आहे.
तरुणांचा सहभाग
रायगड जिल्ह्यात पूर्वीपासूनच कलिंगडाची लागवड केली जात आहे. आता तर या व्यवसायात सुशिक्षित तरुण उतरले असल्याने रायगडमध्ये कलिंगडाचे उत्पादन वाढत चालले आहे. सध्या शुगरक्वीन जातीच्या कलिंगडांना सर्वाधिक मागणी आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी स्टॉल उभारून या कलिंगडांची विक्री केली जात आहे; तर किरकोळ बाजारात दर्जानुसार एक कलिंगड १०० ते १५० रुपयांपर्यंत मिळत आहे.
source-agrowon