Workshop Gujarat : कृषि विज्ञान केंद्रांची ८वी विभागीय कार्यशाळा गुजरात येथे..

Workshop Gujarat : भुज (गुजरात) येथे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांची ८ वी विभागीय वार्षिक कार्यशाळा २० ते २२ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय कृषि अनुसंधान परिषदच्या कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग अनुसंधान संस्था (ICAR-ATARI), विभाग क्रमांक VIII, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून, कच्छ I, कच्छ II, मेहसाणा व पाटण येथील कृषि विज्ञान केंद्रांनी आयोजनात सहकार्य केले आहे.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘महाविस्तार ॲप’सह आधुनिक विस्तार साधनांच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन केले. कृषि संशोधनाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञांनी नव्या विस्तार मॉडेल्सचा अवलंब करावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भव:’ या मूल्यावर आधारित उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ आणि ‘ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ हे देशातील आगळे-वेगळे मॉडेल्स असून, त्यातून शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन मिळते, असे ते म्हणाले. या उपक्रमांचा अनुभव इतर केंद्रांनाही प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत भाकृअपचे माजी उपमहासंचालक डॉ. पी. दास, सबौर येथील बीएयूचे माजी कुलगुरू डॉ. ए. के. सिंह, मोहनपूर येथील बीसीकेव्हीचे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. अधिकारी, तसेच आरएआरडीएस (मुंद्रा)चे ट्रस्टी श्री. रजनीकांत पटवा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाकृअपचे सहायक महासंचालक डॉ. आर. रॉय बर्मन यांनी ऑनलाइन माध्यमातून आपले विचार मांडले.

या कार्यशाळेत आटारी-पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. आयएफएफसीओचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरनिंदर सिंग यांनी आयएफएफसीओच्या नव्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यशाळेत मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांचे समन्वयक आणि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचा उद्देश कृषि विज्ञान केंद्रांमधील अनुभवांची देवाणघेवाण, शेतकऱ्यांपर्यंत नवकल्पनांची प्रभावी पोच, आणि शाश्वत तंत्रज्ञान प्रसारासाठी केंद्रांची कार्यक्षमता वाढवणे हाच असून, या दिशेने ही कार्यशाळा महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.