संपूर्ण विदर्भातील आवडीचे व उत्कृष्ट उत्पादन घेणारे पिक म्हणजेच तुर या पिकांवरील मारुका या किडी बदल माहिती देण्यासाठी आलो . या बदल संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा ही विनंती मारुका ही संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मध्ये शेंगा पोखरणारी अळी या नावाने सुध्दा ओळखले जाते. या किडी बदल माझे मार्गदर्शक संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी साठी नवनवीन माहिती देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे माझे मार्गदर्शक श्री राजेश डवरे साहेब किटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम या बदल माहिती दिली सोबतच डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तज्ञ लोकांसोबत चर्चा घडवून या किडी बदल ची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. या बदल आणखी माहिती मिळाल्यास नक्की शेतकरी पयऺत पोहचवण्यासाठी मदत करावी ही विनंती.
मारुका किडीचा ( अळी) प्रादुर्भाव प्रामुख्याने पिक फुलोर्यात येण्याच्या कालावधीत जास्त आर्द्रता व मध्यम तापमानावेळी आढळुन येतो. हि अळी पाने , फुले, कळ्या व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करुन त्यामध्ये लपून बसते. या अळीमुळे खोडाची वाढ खुंटते आणि उत्पादनात १५ ते २५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. शेंगा पोखरणारी अळी हि किड बहुभक्षी असुन तुर, कापूस, भेंडी, टोमॅटो, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसुन येतो. अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करुन अळीसहीत नष्ट करावे. शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणार्या अळीचे खाद्य पदार्थ असलेले तण काढुन टाकावे. पिकामध्ये एकरी दोन कामगंध सापळे, दोन नरसाळे सापळे लावावे. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या एक ते दोन फुट उंचीवर पक्षी थांबे उभारावे. पिकांना फुल येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन ३०० पिपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी. परंतु एकात्मिक कीड व्यवस्थापनेचा अवलंब करणे आवश्यक आहे.
थेट रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्यापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे असते. यामध्ये किडीचे भक्षक असलेले क्रायसोपा कारणीया , भक्षक कोळी, ढालकिडा या मित्र कीटकांची संख्या नैसर्गिक वातावरणात चांगली असते.तुर पिकाला नुकसान करणाऱ्या किडींचे नैसर्गिकरित्या हे कीटक नियंत्रण करतात त्यामुळे ही पद्धत अतिशय लाभदायक तसेच कमी खर्चिक आहे
तुरीवरील मारूका या किडीचा नुकसानीचा प्रकार जाणुन घेण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीत आपले आवडते तूर हे पीक फुलोरा अवस्थेत येत आहे.सद्यस्थितीतील तूर पिकावरील मारूका या किडी करता पावसाळी हवामान व रात्रीची थंडी असे वातावरण पोषक ठरू शकते. मारूका ही कडधान्यवरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे. मारूका या किडीची अळी अवस्था पांढुरक्या रंगाची असून ही अळी अर्धपारदर्शक असते. या किडीच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्याच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली या किडीची अळी कळ्या फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करून आत मध्ये राहून कळ्या व फुले खाते. मारूका या किडीची तृतीय किंवा चौथ्या अवस्थेतील अळी तुरीच्या शेंगा पोखरून आतील दाने खाते व नंतर ही अळी शेंगाच्या झूपक्यात किंवा मातीमध्ये कोशात जाते. साधारणपणे या किडीचा जीवनक्रम 18 ते 35 दिवसांत पूर्ण होतो.शेतकरी बंधूनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी योग्य निदान करून आवश्यकतेनुसार खालील उपाययोजनेचा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंगीकार करावा.
तूर या पिकावरील मारूका या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाय योजना :
शेतकरी बंधूंनी प्रथमता तूर पिक विशिष्ट फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना वेळोवेळी शेतात वीस ते पंचवीस ठिकाणी प्रति मीटर ओळीत सर्वेक्षण पाहणी करावी. व मारूका या किडीचा प्रादुर्भाव दोन ते तीन मारूका किडीच्या अळ्या प्रति मीटर ओळीत किंवा त्यापेक्षा जास्त अळ्या प्रति मीटर ओळीत आढळून आल्यास खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.
Flubendiamide 20% 6 ml अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Thiodicarb 75 % 20 ml अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Novaluron 5.25% + Indoxacarb 4.50 SC या संयुक्त कीटकनाशकाची 16 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
टीप : (१) वरील कीटकनाशकाच्या शिफारसी स्वरूपाच्या असून वर निर्देशित संदर्भाप्रमाणे शेतकरी बंधूनी आवश्यकतेनुसार तात्काळ अवलंब करावयाच्या उद्देशाने संकलित करण्यात आलेल्या आहेत
(२) वर निर्देशित कीटकनाशकाच्या फवारणीसाठीच्या मात्र साध्या फवारणी पंपासाठी असून पावर स्प्रेयर करिता फवारणीसाठी वर निर्देशित कीटकनाशकाच्या मात्रा तिप्पट कराव्यात.
(३) फवारणी करताना अनेक रसायनाचे, खताचे,संप्रेरकाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करणे टाळावे तसेच फवारणी करताना कीटकनाशकाच्या निर्देशित मात्रेचे प्रमाण पाळावे व पाण्याचे योग्य शिफारशीप्रमाणे प्रमाण राखून फवारणी करावी.
(४) फवारणी करताना सुरक्षा किट वापरावा व सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा तसेच फवारणी करण्यापूर्वी योग्य निदान करून आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच फवारणी करावी.सोबतच पुन्हा एकदा माझे मार्गदर्शक श्री राजेश डवरे साहेब कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे तज्ञ मार्गदर्शक चे मी आभारी आहे. त्यांनी ही प्रामाणिक प्रयत्न च्या या भागासाठी मदत केल्याबद्दल
लेखक:
कार्तिक मिनाक्षी विलासराव देशमुख .
(लेखक हे ग्रामसेवक असून दगडधानोरा पंचायत समिती नेर येथे कार्यरत आहेत .)