रब्बी हंगामात एक रुपयातच विमा; असा करता येईल विम्यासाठी अर्ज , वाचा सविस्तर ..

खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर राज्य शासनाने आता रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे.  अशी माहिती कृषी संचालक दिलीप शेंडे यांनी दिली.

गेल्या हंगामामध्ये सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांनी सुमारे साडेसात लाख हेक्टर वरील रब्बी पिकांचा विमा उतरवला आहे.  खरीप हंगामात या योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे रब्बी हंगामातही मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

  राज्याध्ये रब्बी हंगामात 7  लाख 45 हजार 316 शेतकऱ्यांनी पाच लाख 34 हजार 947 हेक्टर वरील पिकांचा विमा उतरवला होता.  त्यामध्ये 2 हजार 32 कोटी रुपयांची रक्कम विमा सुरक्षित करण्यात आली होती.

शेतकऱ्यांच्या हिस्स्यपोटी 33 कोटी रुपये जमा करण्यात आले होते तर केंद्र व राज्य सरकारने हिश्यपोटी प्रत्येकी सुमारे 122 कोटी दिले होते तर एकूण विमा हफ्ता 277 कोटी रुपयांचा होता.  त्यापैकी 50 हजार 675 शेतकऱ्यांना 18 कोटी 90 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती . अशी माहिती समोर आलेली आहे.  यंदा खरीप हंगामात एक कोटी बारा लाख 42 हजार हेक्टर वरील पिकांचा विमा उतरवण्यात आला. एकूण पेरणी क्षेत्र च्या हे प्रमाण सुमारे 79% इतके आहे.

यावर्षी मान्सूनच्या अखेरच्या सत्रामध्ये पाऊस न झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली तसेच पावसाअभावी उत्पन्न घटले आहे . यामुळे विमा कंपनी ने नुकतेच अग्रीम देण्यास मान्यता दिली आहे.

असा करता येईल विम्यासाठी अर्ज 

1. राज्य मध्ये 2023-  24 पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  त्याचप्रमाणे शेतकरी  हिश्याचा विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे.  या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

2.  रब्बी ज्वारी साठी 30 नोव्हेंबर पर्यंत तर गहू (बागायत) हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत . तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

3. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या https://pmfby.gov.in/ पोर्टलवर स्वतः शेतकरी, बँक विमा कंपनी, अथवा सामूहिक सेवा केंद्रमार्फत नोंदणी करता येणार आहे.

प्रत्येक अर्जासाठी 40 रुपये दिले जातात.

पुणे, हिंगोली ,अकोला, धुळे, उस्मानाबाद, जिल्ह्यासाठी एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातारा ,नगर ,नाशिक, चंद्रपूर ,सोलापूर, जळगाव, जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे.  या योजनेमध्ये सहभागांची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रत्येकी अर्जासाठी 40 रुपये देण्यात येतात.

त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून नोंदणी करावी.  अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय ,नजीकची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी ,यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.  कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक असेल.  या योजनेत  सहभाग घ्यायचा नसेल तर विहित मुदतीत बँकेत लेखी कळवणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

Leave a Reply