![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/मका-या-शेत-पिकाचा-बाजार-पुढील-काळात-कसा-राहू-शकतो-वाचा-सविस्तर.webp)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सोयाबीनचे वायदे काल दुपारपर्यंत 13.50 डॉलर प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयाबीन पेंड चे वायदे 427 डॉलर प्रति टनावर होते. देशातील बाजारातही सोयाबीन मध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. तर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4800 ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला . बाजारातील सोयाबीनची आवक स्थिर दिसते तर अनेक शेतकरी आता भाव वाढीच्या प्रतीक्षेत असल्याचे व्यापारी सांगतात . तर सोयाबीनचा भाव या पातळीच्या दरम्यान आणखीन काही दिवस दिसू शकतो असे अभ्यासकांनी सांगितले आहे.
देशातील बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत व्याद्यांमध्ये भाव स्थिर दिसत नाही. आता नुकत्याच पडलेल्या पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण मालाला उठाव मिळण्याची शक्यता आहे . सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी 6700 ते 7300 रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची आवक मागील पाच दिवसांमध्ये पावसामुळे कमी झाली होती तर आता शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस मागे ठेवण्याची शक्यता आहे . त्यामुळे कापूस बाजाराला आधार मिळू शकतो. असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
मक्याचे भाव मागील आठवड्यापासून स्थिर दिसतात . यंदा खरिपातील मका उत्पादनात मोठी घट झाली . त्यामुळे मक्याच्या भावात मागील महिन्याभरात क्विंटल मागे तीनशे रुपये पर्यंत वाढ झालेली आहे . मक्याचे बाजार भाव सरासरी 2000 ते 2200 रुपयांवर पोचला.मक्याची बाजारातील आवक कमी असली तरी मागणी पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही त्यामुळे दरात अपेक्षित वाढ नाही पण रब्बीतील पिकाला दुष्काळ आणि वाढते उष्णतेचा फटका बसू शकतो म्हणजेच उत्पादनात घट येऊ शकते त्यामुळे मका बाजाराला चांगला आधार मिळू शकतो. असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
आल्याच्या भावातील नरमाई कायम आहे. आल्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झालेला होता . तसेच नवा माल बाजारात पुढील एक ते दीड महिन्यात सुरू होईल त्यामुळे आल्याचे भाव आता 7000 ते 9000 च्या दरम्यान आहे. यंदाही आले उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पण नवा माल बाजारात येणार यामुळे दरात नरमाई दिसून आली पण बाजारातील नव्या मालाची आवक एकदा येऊन गेल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
बाजारात हिरव्या मिरचीच्या भावात मागील काही दिवसापासून नरमाई आल्याचे दिसते . बाजारातील आवक स्थिर आहे काही बाजारात आवक वाढल्याने दरात नरमाई देखील दिसून आली आहे. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी 2500 ते 3500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पावसाने मिरचीला देखील मोठा तडाखा दिला ,अनेक भागात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे हा माल बाजारात येत आहे . पण पुढील काळात पिकांसाठी पुरेशे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे . त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.