![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/महाराष्ट्र-साखर-उत्पादनात-आघाडीवर.webp)
देशातील साखर उत्पादनामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. महाराष्ट्राने ऊस गाळपात ६७६ लाख टनांचे गाळप केले. सरासरी ९.६० टक्के उताऱ्यासह ६५ लाख टनांचे महाराष्ट्राने साखर उत्पादन तयार केले आहे. देशातील १९२८ लाख टन ऊस गाळप ५१७ कारखान्यांमधून झाले आहे.
यावर्षी नवे साखर उत्पादन सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनांचे झाले. राज्यामध्ये यंदा हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे मार्चअखेर ते एप्रिल मध्यापर्यंत हंगाम चालण्याचा अंदाज आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशननेही व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने हा अंदाज वर्तवला आहे.
दुसऱ्या नंबरवर असलेले उत्तर प्रदेश यामधील ऊसगाळप ५७४ लाख टन झाले आहे, त्या मधून सरासरी १०.५ टक्के उताऱ्यासह साखर उत्पादन ५७.६५ लाख टन झाले आहे.अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एप्रिल अखेर ते मे मध्यापर्यंत गाळप हंगाम चालू शकतो असा अंदाज आहे. तिसऱ्या नंबर वर असलेल्या कर्नाटकने ३७७ लाख टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ९.७५ टक्के उताऱ्यासह साखर उत्पादन जवळपास ३७ लाख टन झाले आहे.
नवे साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा ,उर्वरित सर्व राज्यांतील होणारे ऊस गाळप, लक्षात घेता या वर्षीच्या हंगामाअखेर देश पातळीवरील नवे साखर उत्पादन ३१४ लाख टनांचे होणे अपेक्षित आहे. यंदा परतीचा पाऊस तसेच इथेनॉल निर्मितीकडे वळणाऱ्या साखरेवरील आणलेले निर्बंध यामुळे नव्या साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.
यावर्षी सुरुवातीच्या अंदाजानुसार ११०० ते १२०० लाख टनांच्या आसपास राज्याची एकूण ऊस उपलब्धता वर्तवली गेली होती. परंतु, ऐन पावसाळ्यात पावसाने खंड दिल्यामुळे .साखर कारखान्यांची ऊस टंचाईच्या भीतीने झोप उडाली होती. मात्र, अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांत उसाचे उत्पादन चांगले झाले .
आधीच्या अंदाजानुसार यावर्षी राज्यामध्ये ८५ ते ८८ लाख टन इतके साखर उत्पादन तयार होईल, असा अंदाज होता . परंतु, साखर उद्योगाच्या मते , कारखान्यांमधील गाळपाचे नियोजन बघता यावर्षी एकूण साखर उत्पादन ९० ते ९५ लाख टनांपर्यंत राहू शकते.
अपेक्षित साखर उत्पादन मागील वर्षीच्या ३३१ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत १७ लाख टनाने कमी आहे. देशातील साखर उत्पादनाचा ताळेबंद पाहता वर्षा अखेरीस ७५ ते ८० लाख टन साखर उत्पादन शिल्लक राहणे अपेक्षित आहे.
आणखी किमान साखरेचा इथेनॉल निर्मितीकडे १५ लाख टन वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे कारखान्यात साखर तयार होऊन पडून असलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होईल व आर्थिक समस्येवर तोडगा निघेल .
– जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने उसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे . तसेच नोंदणी नसलेल्या उसाचीही अनपेक्षित उपलब्धता आहे. अंतिम टप्प्यात त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढेल आहे. हंगाम काही ठिकाणी उशिरा सुरू झाला. खूप ठिकाणी मजूर टंचाई देखील आहे. त्यामुळे हंगाम फेब्रुवारीत संपेल, अशी शक्यता वाटत तरी नाही. राज्यातील हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील, असा नवीन अंदाज आहे.
– भगत पाटील, अध्यक्ष, ऑल इंडिया शुगर ट्रेड क्रॉप कमिटी
आणखीन पन्नास ते साठ दिवसांपर्यंत राज्यात चांगला ऊसपुरवठा कारखान्यांना होऊ शकतो. त्यामुळे आणखी किमान ३०० लाख टनांच्या आसपास ऊस गाळप होण्याचे चित्र दिसत आहेत.
– बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा
अशी आहे राज्यातील ऊस गाळपाची स्थिती:
विभाग…सहकारी कारखाने…खासगी कारखाने…आतापर्यंतचे गाळप…तयार झालेली साखर
कोल्हापूर…२६…१४…१५०.२९…१६४.४९
पुणे…१८…१३…१३७.४२…१३४.७५
सोलापूर…१९…३१…१४४.१७…१२६.६३
अहमदनगर…१६…११…८४.८…७८.०६
छत्रपती संभाजीनगर…१३…९…६२.५९…५१.३७
नांदेड…१०…१९…७४.६…७०.८२
अमरावती…१…३…५.९८…३.३२
नागपूर…०…४…२.११…०.८६
(गाळपाची २९ जानेवारीअखेरची स्थिती. ऊस गाळप लाख टनांत. साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये)