राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जनावरांना एअर टॅगिंग केलेले नसेल तर १ जूनपासून जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही अशा सूचना दिल्या होत्या . भारत पशुधन या प्रणालीवर या माध्यमातून देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी विभागाकडून मोहीम राबवण्यात आल्यानंतरही जनावरांना एअर टॅगिंग केले नाही त्यामुळे आता जनावरांच्या बाजारामध्ये आलेल्या जनावरांची एअर टॅगिंग करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी,जनावरांची खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांच्या नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे . यामुळे चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, विशिष्ठ भागातून जनावरांची खरेदी-विक्री वाढणे,दुष्काळ या अनुषंगाने निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी विक्री टॅगिंग करुन करण्यात येईल त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने देण्यात येईल व बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात आजारी जनावरे दाखल झाल्याने होणारे साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
संबंधित जिल्हयाच्या पशुसंवर्धन विभागास पशुधनाच्या बाजारामध्ये खरेदी-विक्रीसाठी करण्यात आलेल्या पशुधनाची माहिती जमा करणे आवश्यक आहे . त्याच प्रमाणे खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग करुन नोंदी अदयावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे . तसेच पशुधनाची ने-आण बाजारामध्ये करताना कोणत्याही प्रकारची क्रुरता होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात सुमारे १५० पेक्षा जास्त जनावरांचे बाजार भरतात ज्यातील १५ बाजार सर्वात मोठे आहेत ज्यामध्ये ५००० पेक्षा जास्त पशुधनाची खरेदी-विक्री करण्यात येते. कमी, मध्यम संख्येच्या पशुधनाची खरेदी-विक्री ८०% पशुधनाच्या बाजारांमध्ये केली जाते. आता बाजारामध्ये एअर टॅगिंग नसलेले पशुधनाची तिथेच एअर टॅगिंग केली जाणार आहे. यासंदर्भामध्ये पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास अधिकारी यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ज्या जनावरांना एअर टॅगिंग नाही केलेले अशा जनावरांना थेट बाजारामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.