केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी (ता. १५) देशातील ९० हजार महिलांना कृषी सखीचं प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये विविध शेती काम आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणार आहे. प्रशिक्षित महिला या त्यानंतर आधुनिक पद्धतीबद्दल आणि तंत्रज्ञानबद्दल शेतकऱ्यांना शेतीमधील बाबतीत मार्गदर्शन करतील, असा केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न आहे.तसेच या महिला शेतकऱ्यांना विविध कामात मदत करणार असून त्याबदल्यात शेतकऱ्यांकडून पैसे घेतील त्यामाध्यातून महिला एका वर्षात ६० ते ८० हजार रुपये कमवू शकतील, असा दावा चौहान यांनी केला आहे..
“शेतकऱ्यांना शेतीकामात मदत करण्यासाठी आम्ही अनेक महिलांना प्रशिक्षित केलं आहे असे चौहान म्हणाले, आता पर्यंत ३४ हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे . त्यामध्ये वाढ करून आता आम्ही ९० हजार महिलांना प्रशिक्षण देणार आहोत.या प्रशिक्षणामध्ये अनेक महिला बचत गटातील महिलाचा सहभाग आहेत. तसेच कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयात याबाबत सामंजस्य करार झाला आहे .”अशी माहिती चौहान यांनी दिली .
केंद्र सरकारने लखपती दीदी योजनेंतर्गत तीन कोटी लखपती महिला निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. याच योजनेच्या अंतर्गत देशातील १२ राज्यांमध्ये कृषी सखी कार्यक्रम राबवला जात आहे. यामध्ये महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश,कर्नाटक, राजस्थान, ओडिशा, आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.
महिलांची भूमिका कृषी क्षेत्रात महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशिक्षित महिला शेतकऱ्यांना सल्ला देण्याचे काम करू शकतील. त्या कामाच्या मोबदल्यात शेतकरी कृषी सखींना पैसे देतील. त्यामुळे कृषी विस्तार हा अधिक व्यावहारिक होईल, असा विश्वास अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.
दरम्यान,पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता १८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशमधील वाराणसीमध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच ३० हजारहून अधिक महिला बचत गटांना कृषी सखी प्रमाणपत्र देखील वाटप होणार आहेत .