अतिवृष्टी आणि महापूर या दोन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.त्यात जर आपण महापुराचा विचार केला तर शेती पिकांचे नुकसान तर होतेच परंतु लाख मोलाच्या जमिनी देखील पाण्यात वाहून जातात. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. त्यासोबतच महापुरामुळे या मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे देखील नुकसान होते.
म्हणजेच एकंदरीत विचार केला तर यामुळे जनजीवन विस्कळीत होते तसेच जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. महापुराच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा फटका बसत असतो. अनेक लोक बेघर देखील होतात.
या सर्वात गंभीर असलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची माहिती दिली असून नक्कीच यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांची महापुरापासून सुटका होईल असे आशादायक चित्र या माध्यमातून दिसून येते.
काय आहे सरकारचा प्लान?
याबाबतीत विचार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी जो काही महापुराचा फटका बसतो तो रोखता यावा याकरिता जागतिक बँकेकडे एक प्रोजेक्ट सादर करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यातील महापूराचे पाणी हे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात आणि मराठवाड्यात वळवले जाणार असून या प्रकल्पासह अहमदनगर,
नासिक आणि विदर्भाच्या पाणी प्रकल्पाला लागणारा एक लाख कोटींचा निधी देखील राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजूर न करता उभारणार असल्याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. जर आपण 2019 चा विचार केला तर कोल्हापूर व सांगलीला दरवर्षी जो काही महापुराचा फटका बसतो तो रोखण्यासाठी जागतिक बँकेकडे एक प्रकल्प पाठवण्यात आला व या प्रकल्पाला जागतिक बँकेने तत्वतः मान्यता देखील दिली.
परंतु महा विकास आघाडी सरकारच्या कालावधीत या प्रकल्पाला जी काही गती हवी होती ती मिळाली नाही. परंतु आता या प्रकल्पावर जलद काम सुरू होणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले. पुराचे हे पाणी वळण बंधारांच्या माध्यमातून तसेच टनेलच्या द्वारे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात तसेच उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याकडे आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
तसेच नाशिक व अहमदनगर आणि विदर्भातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी देखील प्रकल्प हाती घेत असल्याची माहिती त्यांनी दिली असून यासाठी लागणारा आवश्यक एक लाख कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातला हात न लावता उभारणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
त्यामुळे या योजनेने नक्कीच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी येणारा महापुरामुळे जे काही नुकसान होते त्याबाबतीत दिलासा मिळेल यात शंकाच नाही. परंतु येणाऱ्या कालावधीत याबाबतीत किती वेगाने काम होते हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु जर हा प्रकल्प वेगात पूर्ण झाला तर नक्कीच मराठवाड्यातील दुष्काळी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग या दोन्ही भागांना खूप मोठा लाभ होईल यात शंकाच नाही.