हे सूत्र लक्षात ठेवले, तर थंडीत घटणार नाही पोल्ट्रीचे उत्पादन

ब-याचदा हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये पक्षांवर अतिताण येतो. त्यामुळे उत्पादनात घट होऊन पक्षांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते व अंडी उत्पादनात घट येते. ऋतुमानानुसार हवामानात होणा-या अचानक बदलामुळे पक्षांच्या वर्तणुकीमध्ये वातावरणाशी समरस होण्यासाठी बदल होत असतात.

कुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, पक्षांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी रोगनियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हिवाळ्यामध्ये रोग उद्भवण्याचे प्रमाण, रोगी पक्षांचे प्रमाण व मृत्यूदर हा मुख्यतः व्यवस्थापनाच्या प्रकारावर व पक्ष्यांना केलेल्या लसीकरणावर अवलंबून असते.

विविध हवामानातील बदलांशी समरस होण्यासाठी पक्षांचे वय तितकेच महत्वाचे असते. दोन महिन्याच्या आतील (हा मुख्य वाढीचा काळ आहे) आणि सहा महिन्याच्या वरील वयाचे पक्षी (वयात येणारे पक्षी) हे संसर्गजन्य आजारांना जास्त प्रमाणात बळी पडतात.

कोंबड्यामध्ये हिवाळ्यातील आजारांमध्ये मुख्यतः श्वसनास त्रास होणे, तणावाखाली असणे, नैराश्य असणे, हगवण, खाद्य न खाणे, विखुरलेले पंख, सुजलेला चेहरा व पाय पुढे घेऊन पडून राहणे यासारखी लक्षणे आढळतात. अशी लक्षणे ब-याच रोगांमध्ये आढळतात. त्यामुळे रोगनिदान करणे अवघड होते. हिवाळ्यामध्ये मुख्यत: आय.बी.डी (गंबोरो), फाऊल पॉक्स, फाऊल कॉलरा, ई. कोलाय, सालमोनेला हे रोग आढळतात.

अतिथंडीमध्ये हवेतील आर्दता वाढते. त्यामुळे गादी साहित्य तसेच खाद्यामध्ये कवकांची/बुरशीची वाढ होते. यामुळे अस्परजिलेसीस रोगाची लागण होऊन हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या गाठी फुफ्फुसात निर्माण होऊन श्वसनामध्ये अडथळा येतो.हिवाळ्यामध्ये पक्षांच्या जास्त प्रमाणात आजारी पडण्याच्या प्रमाणाला शेडमधील अनियंत्रित हवामान कारणीभूत ठरते.

यामध्ये शेड व्यवस्थापन नीट नसणे, शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे, एका ठिकाणी जास्त पक्षी ठेवणे, खाद्य कमी पुरवठा करणे हे घटक कोंबड्या आजारी पडण्यास कारणीभूत ठरतात.

कोंबड्यापासून चांगल्याप्रकारे उत्पादन मिळविण्यासाठी शेडमधील तापमान २१ ते २३ अंश सें.ग्रे. पर्यंत राहणे आवश्यक आहे. परंतु थंडीमध्ये काही भागातील तापमान २१ अंश सें.ग्रे. पेक्षा खूप कमी होते, अशावेळी पक्षांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जादा ऊर्जेची गरज असते. हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर पक्षी कोल्डस्ट्रोकने (थंडीच्या कडाक्याने) मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिवाळ्यात पक्षांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply