Red onion market price will hike due to Nafed and nccf onion Scam in next 15 days
मागील काही दिवसांपासून बाजारातील उन्हाळी कांद्याचा दर साठा संपत आल्याने वाढले आहेत, तर दुसरीकडे खरीपातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू न झाल्याने कांद्याचे भाव वधारलेलेच आहेत. मागील आठवड्यात कांद्याच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली असली, तरी आगामी काळात नवीन लाल कांदा दाखल झाल्यावरही भाव वाढण्याची शक्यता आहे. येत्या १५ दिवसात लाल कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
नाफेडचा केवळ दीड लाख टन कांदा बाजारात:
सध्या बाजारात लाल कांद्याला सरासरी अडीच ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत आहे, तर उन्हाळी कांद्याला सुमारे साडेपाच हजाराच्या आसपास सरासरी बाजारभाव मिळत आहेत. ग्राहकांना मात्र कांदा ८० ते १०० रुपये प्रति किलोने खरेदी करावा लागत आहे. ग्राहकांना कांदा वाजवी दरात मिळावा यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने मूल्य स्थिरीकरण योजेनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून यंदा ४ लाख ७० हजार लाख मे. टन कांदा खरेदी केला. त्यातील सुमारे दीड लाख मे. टन कांदा बाजारात पाठविण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली असून अजूनही ३ लाख मे. टन कांदा साठवणूकीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा खरेदीत झाला घोटाळा, फटका सामान्यांना मात्र नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत यंदा काही शेतकरी उत्पादन कंपन्या आणि अधिकारी यांनी मिळून कोट्यवधींचा कांदा घोटाळा केल्याचे यंदा माध्यमातून उघडकीस आले. कमी भाव असताना कांदा खरेदी करून भाव वाढल्यावर बाजारात कांदा विकून टाकायचा मात्र प्रत्यक्ष साठवणूकीत कांदा असल्याचे दाखवायचे, प्रसंगी शेतकरी व त्यांचे सात बाराही बनावट दाखवून कांदा सरकारी पैसे घेऊन कोट्यवधींचा फायदा कमावायचा असा या घोटाळ्याचा पॅटर्न होता. नाफेडचे चेअरमन जेठाभाई अहिर यांनीही याला नाशिक भेटी दरम्यान दुजोरा दिला होता.
म्हणून कांद्याला अच्छे दिवस येणार:
यंदाही घोटाळेबाजांनी नाफेडसाठी कागदोपत्री कांदा खरेदी केली, तसेच जो काही थोडा कांदा खरेदी केला, तोही भाव वाढल्यावर खुल्या बाजारात विकून टाकला. परिणामी नाफेड आणि एनसीसीएफला देण्यासाठी या संस्थांकडे कांदाच शिल्लक नसल्याचे खात्रीलायक समजत आहे. त्यामुळे त्यांना हा कांदा खुल्या बाजारातून विकत घेऊन त्याची भरपाई करावी लागणार असून सुमारे ३ लाख मे. टन कांद्याची एकदम खरेदी होणार असल्याने पुढचे काही दिवस लाल कांद्याला अच्छे दिवस येण्याची शक्यता आहे. या खरेदीमुळे भाव वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तर होणार गुन्हे दाखल:
दरम्यान दोन दिवसापूर्वी केंद्राचे एक पथक नाशिक परिसरात येऊन कांद्याच्या साठ्याची पाहणी करून गेल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांना साठवलेला कांदा संबंधित शेतकरी कंपन्यांनी विकून टाकल्याच दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधिताना १५ दिवसात कांदा भरपाई देण्याची नोटीस बजावल्याचे समजते. तसेच हा कांदा परतावा दिला नाही, तर शेतकरी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची तंबीही या अधिकाऱ्यांनी संबंधित घोटाळेबाजांना दिली आहे. त्यामुळे सध्या कांदा घोटाळेबाजांचे धाबे दणाणले असून भरपाईसाठी कांदा नसल्याने त्यांच्यावर बाजारातून कांदा विकत घेऊन देण्याची वेळ आल्याने त्याचा परिणाम कांदा बाजारभाव वधारण्यावर होणार आहेत.