ऐन मतदानाच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्रात सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश दिला असून काल दिनांक १८ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यातील काही सोयाबीन खरेदी नाफेडच्या माध्यमातून होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आता सर्वच प्रकारचा सोयाबीन खरेदी केला जाणार असून याआधी १२ टक्के ओलाव्याचे निकष होते, ते वाढवून आता १५ टक्के करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीनचे हमीभाव प्रति क्विंटल रू. ४८९२/- असे आहेत.
दरम्यान हमीभाव खरेदी केंद्रांमुळे बाजारसमित्यांमधील बाजारभाव वाढणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. हमीभाव केंद्रासाठी शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केलेली होती. मात्र अनेक ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रांना सुरूवात झालेली नव्हती. केंद्राच्या या निर्णयाने सोयाबीन हमीभावाची केंद्रे सुरू होणार आहेत. दरम्यान काल दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सांगली बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४८०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. पण लातूर बाजारासह इतर महत्त्वाच्या बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे दर फारसे वधारल्याचे दिसले नाहीत.
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची सुमारे २६ हजार क्विंटल आवक झाली, त्याचे दर सरासरी ४२५० रुपये प्रति क्विंटल असे होते. तर जळगाव आणि पाचोरा बाजार समितीत सोयाबनीचे सरासरी दर ३५०० ते ३८०० प्रति क्विंटल राहिले. आजपासून शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही नोडल एजेन्सी सोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरीता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करुन नाफेड व एन.सी.सी.एफ . कार्यालयाने २६ जिल्ह्यांतील एकुण २५६ खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी २४२ खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली असल्याचे म्हटले होते, पण प्रत्यक्ष कार्यन्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात आली नव्हती. ती आता सुरू करण्यात येत आहे.
अशी करा नोंदणी
शेतकऱी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरीता आपल्या नाफेड/NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन ७/१२उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवुन यावा असे सूचित केलेले आहे. तसेच आजपर्यंत सुमारे ५००० शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.