राज्यात रब्बीचा हंगाम सुरू झाला असून बहुतेक ठिकाणी पेरण्या अजून बाकी आहेत. तर ऊसाच्या पट्टयात अजूनही पूर्व हंगामी ऊसाची लागवड सुरू आहे. दरम्यान ऊसासह रब्बी हंगामासाठी किती पाणी मिळणार? तसेच धरणातील पाणीसाठा किती शिल्लक आहे? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून राज्यातील पाण्याचे नियोजन होऊन विसर्ग होऊ शकतो.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने राज्यातील बहुतेक धरणे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे. अनेक धरणे जवळपास शंभर टक्के भरलेली आहेत.
सध्या राज्यातील एकूण पाणीसाठा लघु, मध्यम आणि मोठे धरणांमिळून ८६.४७ टक्के इतका आहे. हा पाणीसाठा आज दिनांक १९ नोव्हेंबर २४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतचा आहे. मागील वर्षी राज्यात याच कालावधीत एकूण प्रकल्पसाठा हा केवळ ६९.५७ टक्के इतकाच होता. यंदा त्यात सुमारे १८ टक्कयांनी वाढ झाली असल्याने यंदा रब्बी हंगामाला चांगले आवर्तन मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. विशेषत: सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, पुणे, सातारा जिल्हयातील ऊस पट्टयात यंदा चांगले आवर्तन मिळू शकते.
राज्यात सध्या नागपूर विभागात ७६.८१ टक्के, अमरावती विभागात ९०.८१ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८०.७१%, कोकण विभागात ८९.१८ % इतका पाणीसाठा आहे. तर ऊसाचा पट्टा असलेल्या पुणे आणि नाशिक विभागात अनुक्रमे ९०.५७ % व ८६.५% पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी ऊसपट्ट्यातील म्हणजेच पुणे विभागातील पाणीसाठा केवळ ७५.०८ टक्के होता. यंदा त्यात तब्बल १५ टक्कयांनी वाढ झाल्याने ऊस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर नाशिक विभागात मागच्या वर्षीच्या ७५.६० टक्क्यांच्या तुलनेत यंदा दहा टक्यांनी धरणसाठा वाढला आहे. त्याचा उपयोग भाजीपाला, ऊस आणि रब्बी कांद्यासाठी होणार आहे.
ऊजनी आणि वीर धरणात इतका साठा:
दरम्यान आज १९ नोव्हेंबर रोजी ऊजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात उजनीमध्ये केवळ ४१.४१ टक्के पाणीसाठा होता. यंदा सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासह ऊस शेती आणि रब्बीसाठीही पाणी मिळण्याची आशा आहे.
फलटण आणि सातारा परिसरातील ऊस पटट्यातील प्रसिद्ध धरण म्हणजेच वीर धरण. या धरणात सध्या मागच्या वर्षाच्या जवळपास दुप्पट पाणीसाठा आहे. वीर धरणात सध्या ९९.२८%पाणीसाठा असून मागच्या वर्षी याच काळात या धरणात ५६.१२ टक्के पाणीसाठा होता.