रासायनिक खतांच्या वापरामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्यासह माती आणि पाणीही प्रदुषित होत आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बनसारखे घटक कमी होऊ शेतकऱ्यांना नुकसानीचा किंवा कमी उत्पादकतेचा सामना करावा लागलो. एका गावातील शेतकऱ्यांनी मात्र हे चिञ बदलले आणि आता ते शंभर टक्के सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करत आहेत.
या गावच नाव आहे हरनेड. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्हयात हे गाव आहे. सध्या नैसर्गिक शेतीमुळे गाव चर्चेत आले आहे. हरनेड गावातील सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा संकल्प केला असून आता हे गाव एक आदर्श गाव म्हणून उदयास येऊ लागले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हरनेड गावातील सर्व 62 शेतकरी कुटुंबांची सुमारे 264 बिघे जमीन ‘नैसर्गिक शेती, खुशाल किसान’ योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीखाली आणली. त्यासाठी शेतकऱ्यांना 2-2 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.
यानंतर गावातील प्रगतशील शेतकऱ्यांनाही कृषी विद्यापीठ, पालमपूर येथे प्रशिक्षणासाठी पाठवून त्यांना देशी गायी खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात आले. आता गावातील 59 शेतकरी कुटुंब सुमारे 218 बिघा जमिनीवर पूर्णपणे नैसर्गिक शेती करत आहेत. आता ते प्रत्येक हंगामात एकच पीक घेण्याऐवजी एकाच वेळी अनेक पिके घेत आहेत. गावातील प्रगतशील शेतकरी ललित कालिया यांनी सांगितले की, आत्मा प्रकल्पाच्या अधिका-यांच्या प्रेरणेने पालमपूर येथे प्रशिक्षण घेतले आणि नैसर्गिक शेती सुरू केली.
आता ते आपल्या संपूर्ण जमिनीवर केवळ नैसर्गिक शेती करत असून कोणत्याही प्रकारची रासायनिक खते किंवा रासायनिक कीटकनाशके वापरत नाही. नैसर्गिक शेतीसाठी ते स्वतः बिजामृत, जीवामृत, ड्रेकस्त्र, अग्निस्त्र व इतर साहित्य घरीच तयार करत आहेत. खरीप हंगामात ते मक्याबरोबरच, भरड धान्ये, कडधान्य पिके, तेलबिया पिके म्हणून तीळ यासह आले आणि हळद ही पिके घेत आहेत. रब्बी हंगामात गव्हाबरोबरच मोहरी, हरभरा, वाटाणा आदी पिकांचीही लागवड करतात.
विषमुक्त शेतीसोबतच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक पौष्टिक भरड धान्य आणि इतर पारंपारिक पिकांच्या संवर्धनातही गावकरी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता राज्य सरकारने नैसर्गिक शेतीतून घेतलेल्या पिकांसाठी स्वतंत्र किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे, जी सामान्य किंमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे.
हरनेड गावातील शेतकऱ्यांनी आता संपत असलेल्या खरीप हंगामातील मका ३० रुपये किलो दराने विकला, तर पूर्वी मक्याची किंमत साधारणपणे १८ ते २० रुपये किलो होती. अशा प्रकारे, हमीरपूर जिल्ह्य़ातील हरनेड हे छोटेसे गाव नैसर्गिक शेतीत एक आदर्श गाव म्हणून उदयास येत आहे. राज्य सरकारच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या शेतकऱ्याना आता खते, किटकनाशके, रासायनिक औषधे यांचा खर्च शून्य येत असून सेंद्रिय शेतमाल असल्याने बाजारभावापेक्षा त्याला जवळपास दीडपट ते दुप्पट भाव मिळत आहे. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढले आहे.












