Kardai Seed: आता करडईच्या या नव्या वाणांमुळे मिळेल, तेलाचे उच्च उत्पादन..

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प करडई विभागाने करडई (kardai Variety) संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. या वाणाचे उत्पादन चांगले असून तेलाचा उताराही चांगला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. लवकरच हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

कोरडवाहून शेतीसाठी उपयुक्त
पर्जन्याधारित शेतीसाठी उच्च उत्पादनक्षम, तेलयुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या सुधारित करडई वाणांची निर्मिती करण्यावर केंद्राने भर दिला आहे. या संशोधनामधून शारदा, पीबीएनएस १२ (परभणी कुसुम), पीबीएनएस ४० (सेमी स्पायनी), पीबीएनएस ८६ (पूर्णा), पीबीएनएस १८४ आणि पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) यासारखे वाण मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील करडई लागवडीच्या ९० टक्के क्षेत्रावर हे वाण घेतले जात आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने करडईचे नवीन पीबीएनएस २२१ आणि पीबीएनएस २२२ वाण नुकतेच विकसित केले आहेत. या वाणाची दिनांक २८ – २९ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था (IIOR) येथे आयोजित वार्षिक करडई कार्यशाळेत झोन १ साठी प्रसारीत करण्यासाठी शिफारस केली आहे. यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांचा समावेश होतो.

नवीन वाणाची वैशिष्ट्‌ये:
पीबीएनएस २२१ आणि पीबीएनएस २२२ या वाणांमध्ये ३४ % पेक्षा जास्त तेलयुक्तता आढळून आली आहे, जी यापूर्वीच्या वाणांच्या तुलनेत अधिक आहे. या वाणांद्वारे पर्जन्याधारित परिस्थितीत १५ क्विंटल/हेक्टर तर सिंचनाच्या परिस्थितीत १८-२० क्विंटल/हेक्टर इतके उत्पादन घेता येते.

पीबीएनएस २२१ वाणाचे तेल उत्पादन ३४ % ( ५२५ किलो/हेक्टर) तर पीबीएनएस २२२ वाणाचे तेल उत्पादन ३४.४ % (५३३ किलो/हेक्टर) आहे. ही दोन्ही वाण पानावरील ठिपके (अॅल्टरनेरिया लीफ स्पॉट) यासारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम असून सिंचित आणि पर्जन्याधारित अशा दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी योग्य आहेत. या वाणांमुळे करडई शेतीच्या आर्थिक शाश्वततेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

या वाणांच्या विकासासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल केंद्राने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच या वाणांच्या निर्मितीत सहभागी शास्त्रज्ञांचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन. यामध्ये डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल, करडई शास्त्रज्ञ, तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *