
grape and onion : सांगली आणि नाशिक परिसरात अर्ली द्राक्षाचा हंगाम सुरू होत असून काही शेतकऱ्यांची द्राक्षे बाजारात जायला सुरूवातही झाली आहे. दुसरीकडे कांदा पट्ट्यात लाल कांद्याचा हंगाम आता वाढणार आहे. सध्या द्राक्ष आणि कांदे या दोन्ही पिकांना समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. त्यामुळेच की काय या पिकांना आता निसर्गासह चोरांचाही धोका निर्माण झाला आहे.
वटवाघळांनी खाल्ली द्राक्ष..
द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव, जि. सांगली येथील काढणीवर आलेल्या द्राक्ष शेतीवर वटवाघळांची धाड पडली आहे. या धाडीत वटवाघळांनी शेतकऱ्यांची संपूर्ण द्राक्ष फस्त केली आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांनी हे द्राक्ष काढून विक्रीसाठी बाजारात पाठविण्याचे शेतकऱ्याचे नियोजन यामुळे कोलमडले असून त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील हातनूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी विठ्ठल पाटील यांच्या शेतात तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून सुमारे दहा टन सोनाका द्राक्षांचे नुकसान झाले आहे.
कांद्यावर चोरट्यांचा हात साफ..
सध्या रांगडा आणि पोळ (खरीप आणि लेट खरीप) कांद्याच हंगाम सुरू असून लवकरच बाजारात येणारे कांदे वाढणार आहेत. सध्या लाल कांद्याला सरासरी ३७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांद्याला महत्व आले आहे. येवला येथील शेतकऱ्याच्या काढणी केलेल्या कांद्याला चोरांनी हात दाखवला असून सुमारे ५ क्विंटल कांदा त्यांनी लांबवला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शिरसगाव येथे ही घटना घडली आहे. शेतकरी सुभाष पाटील यांनी बाजारात नेण्यासाठी कांदा शेतात काढून ठेवला, मात्र रात्रीतून त्याची चोरी झाल्याने त्यांच्या आकांक्षांवर पाणी फेरले आहे.
दरम्यान या आधीही कांद्याची चोरी नाशिक, नगर येथे झाली आहे, टोमॅटोचीही चोरी होत असते. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या कांद्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.