
दिनांक ५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात आता भाजपाचा वरचष्मा असलेले महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तो पुढील आठवडयात होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे ऐन निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या आणि नंतर अपक्ष निवडणूक लढवून पराभव पत्करावा लागलेल्या भाजपाच्या माजी नेत्यांना आता पुन्हा घरवापसीचे वेध लागले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या घटक पक्षांकडून उमेदवारीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र यंदा अपवाद वगळता भाजपाने अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांनाच पु्न्हा संधी दिल्याने इच्छूक नाराज झाले. त्यानंतर अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या माध्यमातून, तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
मात्र यातील ९० टक्के बंडखोरांना पराभवाचा सामना करावा लागला असून काहींचे तर डिपॉझिट जप्त झाले. अशातच महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याने अनेकांची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षात म्हणजेच भाजपात परतण्याचे वेध लागले आहे.
दोनच दिवसांपूर्वी बीडमधील एक माजी आमदार सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाऊन आले. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढविली होती. मात्र आता त्यांना भाजपा परतीचे वेध लागले आहेत.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह मुंबईतही अनेक जण पुन्हा भाजपामध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र सध्या स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांना पक्षात घ्यायचे नाही, असा पावित्रा घेतल्याने या बंडखोरांना भाजपा पुन्हा पावन करून पक्षात घेणार की नाही घेणार याकडे कार्यकर्त्यांचे सध्या लक्ष आहे.