
ladki bahin yojna: महायुतीच्या सरकारच्या विजयाचे मोठे गमक म्हणजे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली ‘लाडकी बहिण योजना’. या योजनेमुळे राज्यातील लाखो पात्र महिलांच्या खात्यात दिवाळीपर्यंत प्रत्येकी साडेसात हजार रुपये मिळाले.
दरम्यान निवडणुक प्रचारावेळी भाजपा आणि महायुतीने लाडकी बहिण योजनेतील निधी दरमहा १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करायचे आश्वासन दिले होते. सध्या लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर १५ हजाराहून अधिक कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. त्याची रक्कम वाढविली, तर हा बोजा वाढू शकतो. त्यामुळे ही योजना सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना होता.
काल दिनांक ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपला पदभार स्वीकारला. दरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रालयात आगमन झाल्यावर लाडक्या बहीणींनी औक्षण करून अभिनंदन केले. श्रीमती वैष्णवी जितेंद्र खामकर, श्रीमती मनाली महेश नारकर, श्रीमती शारदा शरद कदम, श्रीमती प्राची प्रफुल्ल पवार, श्रीमती रेखा शेमशोन आढाव या लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले तर श्रीमती लिलाबाई चव्हाण व श्रीमती रेणुका राठोड यांनी पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरूपात राज्यातील लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन केले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले. मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.