केंद्र अडचणीत ? शरद पवार महायुतीत आल्यावर अजितदादांचा वाढणार का मान?

kentra sarkar

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५व्या वाढदिवशी त्यांचे पुतणे अजित पवार सकाळी त्यांच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोनच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले होते. मात्र आता महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने पुतणे अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.

दरम्यान राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोहोंच्याही पक्षांना महत्त्वाची खाती मिळणार नसल्याचे भाजपाच्या गोटातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्थ खाते नसेल, तर आपल्या मंत्रीपदांना काय ‘अर्थ’ राहील असा सूर अजित पवार पक्षाच्या आमदारांनी लावल्याचे समजते. सध्या तरी गृह आणि अर्थ दोन्ही खाती भाजपा आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते.

येत्या १४ डिसेंबरला राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. त्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाला काय मिळणार? याकडे आता या दोन्ही पक्षांच्या आमदारांचे लक्ष आहे.

पवार ठरणार केंद्राचे किंगमेकर
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाकडे सध्या ८ खासदार आहेत. तर अजित पवार गटाकडे केवळ १ खासदार आहे. दोन्ही मिळून ९ खासदार होतात. हे नऊ खासदार जर लोकसभेत केंद्र सरकारसोबत आले, तर केंद्र सरकारला नितीश कुमार यांच्या १२ खासदारांच्या पाठींब्याची आवश्यकता राहणार नाही. राजकारणातील ‘पलटूराम’ अशी उपाधी मिळालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे केव्हाही भाजपाच्या एनडीए सरकारला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशा चर्चा सध्या दिल्लीच्या राजकारणात रंगत आहे.

या पार्श्वभूमीवर जर शरद पवार हे एनडीएसोबत आले, तर केंद्र सरकारचा धोका टळेल आणि राज्यात त्यांच्या पक्षाला तसेच अजित पवार यांच्या पक्षालाही मानाचे पान मिळेल. त्यातून केंद्रात मंत्रिपदे तसेच राज्यात चांगली दमदार खाती मिळण्याची शक्यता बोलवून दाखविली जात आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर भाजपाचे प्रविण दरेकर यांनी तर दोन पावले पुढे जात शरद पवार आमच्यासोबत आले, तर चांगलेच आहे.. असे वक्तव्य करून राजकीय धुरळा उडवला आहे.

Leave a Reply