Kanda Bajarbhav : पाकिस्तानमुळे कांद्याचे दर अचानक खालावले?

Kanda bajarbhav, शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी लासलगाव येथील कांदा बाजारात लिलाव सुरू झाले, तेव्हा शेतकऱ्यांना बाजारभावाचा आकडा पाहून धक्का बसला. कारण हे दर थेट ८ ते १० रुपयांनी घसरले होते. त्यामुळेच आठड्याच्या सुरूवातीला ३८०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर असलेल्या लाल कांद्याला आठवड्याच्या शेवटी अचानक घसरलेला २५०० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला.

कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्काची अट सरकारने काढून टाकावी अशी मागणी करत आहे.

दरम्यान या संदर्भात कृषी २४ ने कांदा निर्यातदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. राज्याच्या फलोत्पादन निर्यात संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की सध्या बाजारात कांदा आवक वाढली आहे. यंदा लागवडीचे क्षेत्र वाढल्यानेही कांदा उत्पादन चांगले झाले आहे. त्याचाही परिणाम कांद्याच्या भावावर होताना दिसत आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे यंदा पाकिस्तानने कांदा निर्यातीत पुन्हा आघाडी घेतली असून भारतापेक्षा कमी दरात म्हणजेच रुपयाच्या चलनात सांगायचे झाल्यास अवघ्या १८ ते १९ रुपये किलोप्रमाणे पाकिस्तान कांदा निर्यात करत आहे. तसेच त्या देशात कांदा निर्यातीवर कुठलेही शुल्क नसल्याने व्यापाऱ्यांना खर्चही कमी येत आहे.

याच्या उलट भारताचा कांदा सध्या ३० रुपये प्रति किलोप्रमाणे निर्यात होत असून त्यावर २० टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. त्यामुळे हा कांदा सुमारे ३५ रुपये किलो किंमतीचा होता. परिणामी भारताचा महाग कांदा घेण्याऐवजी अनेक आंतरराष्ट्रीय कांदा खरेदीदारांनी पाकिस्तानच्या स्वस्त कांद्याला पसंती दिली आहे.

त्यामुळे निर्यात सुरू असली, तरी जागतिक स्तरावर भाव पडतील अशी भीती निर्माण झाल्याने कांद्याचे दर दबावात आले असून व्यापाऱ्यांनी खरेदीत हात आखडता घेतला आहे. परिणामी कांदा जास्त आणि दर कमी अशी स्थिती आहे.

दरम्यान पिंपळगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले की यंदा अवकाळी पाऊस झाल्याने कांदा पट्टा असलेल्या चांदवड, देवळा, लासलगाव, निफाड या परिसरातील हजारो हेक्टर कांद्याला फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांना कांदा जमिनीत सडला आहे, तर ज्यांचा कांदा काढणीवर आला आहे, तो वरून चांगला दिसत असला, तरी आतून खराब असल्याने त्याची टिकवणक्षमता दोन दिवसांपेक्षा जास्त राहिलेली नाही. परिणामी असा कांदा सध्या कमी भावात खरेदी होताना दिसत आहे.

Leave a Reply