
Onion export duty : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान शुक्रवारी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे कृषी मंत्री मा. नामदार श्री. माणिकराव कोकाटे यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. दरम्यान कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात कांदा निर्यातशुल्क शू्न्यावर येईल का याची शेतकरी आणि निर्यातदारांना प्रतीक्षा आहे. सध्या कांद्यावरील निर्यातमूल्य २० टक्के असून ते कमी झाले, तर शेतकऱ्यांना कांदयाचे बाजारभाव २ ते ३ रुपयांनी वाढून मिळतील.
एआय तंत्रावर शेतकऱ्यांसाठी अभ्यासक्रम.
दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री चौहान हे नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रमात शेतकरी असलेले उद्योजक, आदिवासी व महिला तसेच शेतकरी स्वयंसहायता गटाशी संवाद साधणार आहेत. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (ए. आय.) आधारित तयार केलेल्या शिक्षणक्रमाचे यावेळी त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
हा शिक्षणक्रम विद्यापीठातर्फे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम.के.सी.एल.) व कॅनडास्थित कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचे कॉमनवेल्थ एज्युकेशनल मीडिया सेंटर फॉर एशिया (कोल-सेमका), कार्यालय नवी दिल्ली यांच्याशी केलेल्या सामंजस्य करारानुसार तयार करण्यात आलेला आहे