
Kanda RAte : या सप्ताहात देशात कांदा आवक वाढली असून त्या सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा आहे, तर गुजरातमधील आवक मात्र काहीशी घटली आहे. दरम्यान राज्यात काल शुक्रवारी आवक घटून २ लाख २१ हजार क्विंटल इतकी ती राहिली.
परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव २ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सरासरी राहिले. तर उन्हाळी कांद्याचे बाजारभाव नगर आणि नाशिक जिल्हयात २ हजार ते २१०० रुपयांपर्यंत राहिले. गुरुवारच्या तुलनेत बाजारभावात १०० रुपयांची घसरण दिसून आली.
मागच्या आठवड्यात म्हणजेच २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील बाजारांमध्ये एकूण कांदा आवक होती २ लाख ६० हजार ६९ मे. टन. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रातून कांदा आवक १ लाख १ हजार मे. टन इतकी झाली, तर त्याखालोखाल गुजरातमधून ८७ हजार ९८७ मे. टन इतकी झाली.
त्या तुलनेत या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ३ ते ८ मार्च २५ पर्यंत कांदा आवक वाढली असून संपूर्ण देशात ती २ लाख ७७ हजार ५६१ मे. टन इतकी आहे. त्यापैकी राज्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवकेत बऱ्यापैकी वाढ दिसून येत आहे. एकट्या महाराष्ट्रातून १ लाख २७ हजार टन कांदा आवक झाली असून गुजरातमधील कांदा आवक मात्र घटून ७७ हजार ७५८ टन इतकी आहे. इतर राज्यातील आवकेपैकी उत्तरप्रदेशमधील कांदा आवक घटलेली दिसून येत आहे.