turmeric and sugarcane : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
दिनांक 20 ते 26 मार्च 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
ऊसाचे व्यवस्थापन:
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळदीचे व्यवस्थापन:
हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी.
करडई आणि तीळ
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
उन्हाळी तीळ पिकास खताची दूसरी मात्रा दिली नसल्यास देण्यात यावी व त्यासोबत गंधक 20 किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे.
चिकू फळांची काढणी करावी.












