Employment guarantee : रोजगार हमी योजनेतून राज्याच्या शेतीला चालना; असा झाला निर्णय..

Employment guarantee : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी व कामगारांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी महाराष्ट्राला येत्या आठवड्यात मोठा आर्थिक निधी मिळणार आहे. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. ही मागणी लक्षात घेता चौहान यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या बैठकीत गोगावले यांनी राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मजूर काम करत असून, त्यांना रोजगार मिळावा यासाठी निधीची तातडीने गरज आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर केंद्रीय मंत्री चौहान यांनी महाराष्ट्राला पुढील आठवड्यात निधी दिला जाईल, असे स्पष्ट केले.

चौहान यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून कुशल कामगारांसाठी २६०० कोटी रुपये आणि अकुशल कामगारांसाठी १२०० कोटी रुपये असे एकूण ३८०० कोटी रुपये महाराष्ट्राला १० ते १२ एप्रिलदरम्यान देण्यात येतील. राज्यात यंदा १३.५० कोटी मनुष्य दिवसांची कामे झाली आहेत. सध्या राज्याला सुमारे १० कोटी मनुष्य दिवसांचे निधी सहाय्य मिळत आहे.

बैठकीत गोगावले यांनी पुढील वर्षासाठी निधी वाढवण्याची विनंती केली. तसेच, रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर चौहान यांनी सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

Leave a Reply