Dam storage : राज्यातील धरणसाठा पन्नास टक्क्यांच्याही खाली..

Dam storage : राज्यात १० एप्रिल २०२५ रोजीपर्यंत सर्व धरणांमध्ये एकूण ४८२४३.६० दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा १७३५८.७७ द.ल.घ.मी. इतका आहे. ही टक्केवारी ४२.८६ टक्के असून, गतवर्षी याच दिवशी ती ३६.३१ टक्के होती. यावरून यंदा पाणीसाठा जास्त असला तरी अनेक भागांत साठा समाधानकारक नाही.

राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण साठा ४२.४२ टक्के इतका असून, मध्यम प्रकल्पांमध्ये ५०.०६ टक्के आणि लघुप्रकल्पांमध्ये ३८.३७ टक्के साठा नोंदवला आहे. याचा अर्थ लहान प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा असून, या भागांत उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही.

विभागानुसार पाहिल्यास, नागपूरमध्ये ४२.५१ टक्के, अमरावतीत ४७.३९ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७.८६ टक्के, नाशिकमध्ये ४६.९८ टक्के, पुणे विभागात ३७.८२ टक्के तर कोकण विभागात ४३.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत अनेक विभागांमध्ये साठ्याचे प्रमाण वाढले असले तरी पुणे आणि कोकण विभागात अपेक्षेपेक्षा कमी साठा आहे.

राज्यभरातील काही प्रमुख धरणांची स्थिती पाहता, गोसीखुर्दमध्ये ३१.१२ टक्के, काटेपूर्णामध्ये २७.४५ टक्के, पैठण (जायकवाडी) धरणात ४९.४३ टक्के, विष्णुपुरीत ४९.३७ टक्के, माजलगावमध्ये ३८.१३ टक्के, भंडारदरामध्ये ६५.५७ टक्के, निळवंडेमध्ये ३६.७२ टक्के, गंगापूरमध्ये ६०.४३ टक्के, गिरणामध्ये ३०.९४ टक्के, दारणा ४३.७६ टक्के, राधानगरीत ५६.६ टक्के, खडकवासला ५३.१२ टक्के, पवना ३६.८३ टक्के, पानशेत ३९.७५ टक्के, नीरा देवघर १८.७७ टक्के, वारणा ४४.६८ टक्के, कोयना ४४.५४ टक्के तर वीर धरणात ५६.९० टक्के उपयुक्त साठा आहे. यापैकी काही धरणांतील साठा तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक असला तरी अनेक धरणांमध्ये साठा चिंताजनक पातळीवर आहे.

उन्हाळ्यातील वाढती गरज, पाण्याचा ताण आणि संभाव्य टंचाई याचा विचार करता, प्रशासनाने जलसंधारण आणि पुरवठा नियोजनाबाबत पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे जाणकरांचे मत आहे.