Agricultural commodity prices : महागाई नियंत्रणात, शेतकरी तोट्यात; सर्वच शेतमालाचे दर प्रचंड घसरले..

Agricultural commodity prices : महागाई नियंत्रणात असली, तर त्यात शेतमालाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे या आठवड्यातील ॲगमार्कनेटच्या अहवालातून दिसून येत आहे. त्यानुसार संपूर्ण देशभरात शेतमालाच्या घाऊक बाजारभावांमध्ये लक्षणीय घट झाली असून, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे.

अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकृत यंत्रणेद्वारे सादर करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार, तांदूळ, तूर, हरभरा, मूग, कांदा, बटाटा, टोमॅटो, सोयाबीन, मोहरी, शेंगदाणे यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे दर मागील वर्षाच्या तुलनेत बरेचसे खाली आले आहेत. काही पिकांच्या बाबतीत ही घसरण ३० टक्क्यांहून अधिक आहे, जी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीसाठी अत्यंत चिंताजनक ठरू शकते.

सर्वसामान्यपणे खरीप आणि रब्बी हंगामानंतर शेतकरी आपल्या पिकांचा विक्रीचा निर्णय बाजारातील दर पाहून घेतात. मात्र, सध्याच्या घाऊक दरांवर नजर टाकल्यास लक्षात येते की, बाजारात पुरवठा वाढलेला असून मागणी कमी झाल्याने अनेक पिकांचे दर कोसळले आहेत. उदाहरणार्थ, तूर या वर्षी 6791 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे, तर मागील वर्षी हाच दर 10877 रुपये होता. म्हणजेच तुरीच्या दरात तब्बल 37.56 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. हाच कल हरभऱ्याच्या बाबतीत दिसतो. हरभरा सध्या 5631 रुपये क्विंटल दराने विकला जात असून, मागील वर्षीचा दर 5852 रुपये होता.

मूग डाळही या वेळी 8129 रुपयांवर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तिच्या दरात 5.03 टक्के घट झाली आहे. कांदा सध्या 1067 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात असून, मागील वर्षी याच कांद्याचा दर 1372 रुपये होता. म्हणजेच या प्रमुख भाजीपाला पिकाच्या दरात 22.37 टक्क्यांची घट झाली आहे. बटाटा आणि टोमॅटो या दैनंदिन लागणाऱ्या भाज्यांच्या बाबतीत तर घसरण अधिक चिंताजनक आहे. बटाटा सध्या 1147 रुपये दराने विकला जात आहे, तर मागील वर्षी तो 1734 रुपयांवर होता. घसरण जवळपास 33.89 टक्क्यांची आहे. टोमॅटोचे दरही 33.38 टक्क्यांनी घसरले आहेत.

तेलबिया पिकांमध्येही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी घसरण झाली आहे. शेंगदाणे सध्या 4922 रुपये दराने विकले जात असून, मागील वर्षी याच दरात 6363 रुपये मिळत होते. सरसों म्हणजे मोहरीच्या दरातही 14.94 टक्क्यांची घट आहे. सोयाबीनचा दरही मागील वर्षाच्या तुलनेत कमी असून, सध्या 4126 रुपये प्रति क्विंटलवर आहे, जे मागील वर्षी 4431 रुपये होता.

दुसऱ्या बाजूला गहू हे एकमेव असे पीक आहे ज्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या गव्हाचे दर 2479 रुपये प्रति क्विंटल आहेत, जे मागील वर्षी 2325 रुपये होते. म्हणजेच 6.60 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय, मसूर डाळ, उडीद, तीळ सूर्यफूल या पिकांचे दरही सध्या स्थिर आहेत किंवा किरकोळ घसरण दिसून येते.

का होतेय घसरण?:
या घसरणीमागील मुख्य कारणे पाहता, यंदा अनेक पिकांचे उत्पादन चांगले झाले, त्यामुळे पुरवठा वाढला. दुसरीकडे, बाजारपेठेत मागणी तुलनेने मर्यादित राहिल्याने भाव कमी झाले. याशिवाय, निर्यातीवरील अटी, हवामानातील अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या बदलांचा परिणाम देखील देशांतर्गत दरांवर झाला आहे.

या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसतो आहे. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना बाजारात शेतमालाला मिळणारा दर मात्र घटत आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाचीही भरपाई होत नाही. काही भागांमध्ये सरकारने हमीभावाने खरेदी सुरू केली असली तरी ती अपुरी आणि मर्यादित आहे.

शेतकऱ्यांच्या संघटनांकडून सरकारकडे मागणी आहे की, तूर, मूग, हरभऱ्यासारख्या कडधान्यांची अधिक खरेदी केली जावी. प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जावे आणि निर्यातीस अधिक मोकळीक द्यावी, जेणेकरून स्थानिक बाजारावरचा ताण कमी होईल.

शेतकऱ्यांनी काय करावे?
सध्याची स्थिती पाहता, शेतकऱ्यांना दररोज बदलणाऱ्या बाजारभावांची माहिती सतत घेत राहणे आवश्यक आहे. स्थानिक बाजार समित्या, ई-नाम आणि शासकीय पोर्टल्सवर उपलब्ध असलेल्या दरांवर लक्ष ठेवून विक्रीची योजना आखावी. तसेच, पिकांचे उत्पादन, साठवणूक व विपणन या बाबतीत सशक्त योजना राबवून नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा.

सरकारच्या धोरणात्मक हस्तक्षेपाशिवाय ही स्थिती सुधारण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी दीर्घकालीन धोरणांची गरज आता अधिक भासू लागली असल्याचे शेतकरी प्रतिनिधी आणि संघटनांचे म्हणरे आहे.