Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषीमंत्री उद्या नागपूरात शेतकऱ्यांशी साधणार संवाद..

Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान येत्या 18 मे रविवार रोजी नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये दुपारी 12 ते 2 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसोबत किसान संवाद या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत . या कार्यक्रमाला विदर्भातून सुमारे 1500 हून अधिक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्याचे कृषिमंत्री ॲड . माणिकराव कोकाटे , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , भारतीय कृषी संशोधन परिषद- आयसीएआरचे महासंचालक, डॉ. मांगीलाल जाट प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्था एनबीएसएसएलयुपी नागपूरचे संचालक डॉ . एन .जी . पाटील यांनी दिली.

18 मे रोजी दुपारी 3 ते 4 दरम्यान अमरावती रोड स्थित एनबीएसएसएलयूपी येथे महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेले कृषी आणि ग्रामीण विकास कार्यक्रमाबद्दलचा आढावा देखील कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आयसीएआरचे अधिकारी तसेच राज्य शासनाचे अधिकारी, राज्यातील कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसोबत घेतील. याप्रसंगी केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR), केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था (CCRI) चे ही अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी एनबीएसएसएलयूपीने हायपर स्प्रेक्टल सेंसर चा वापर करून देशातील विविध विभागांची मातीची सामू ( पीएच ) ,घनता तसेच मूलद्रव्यांची स्पेक्टोरेडिओ मिटर द्वारे संकलित केलेल्या माहितीचा समावेश असलेल्या ‘नॅशनल सॉईल स्पेक्ट्रम स्पेक्ट्रल लायब्ररीचे देखील उद्घाटन चौहान यांच्या हस्ते होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने कापसावर पडणाऱ्या बोंड अळी कीटक व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचे सुद्धा उद्घाटन याप्रसंगी होणार आहे. ‘विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत कृषी वैज्ञानिकांद्वारे शेतकऱ्यांना खरीप पूर्व शेतीचे मार्गदर्शन तसेच त्यांचा प्रतिसाद देखील संकलित करण्याचा प्रारंभ या कार्यक्रमादरम्यान केला जाणार आहे.