Agriculture Resolution : यंदाच्या खरीप हंगामापूर्वी देशभरात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’…

Agriculture Resolution : खरीप हंगामापूर्वी भारत सरकारकडून देशव्यापी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान राबवले जाणार आहे. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक शेती पद्धती, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि स्थानिक शेतीविषयक उपाय पोहोचवणे हा आहे.
हे अभियान खरीप आणि रबी हंगामापूर्वी दरवर्षी राबवले जाईल. यामध्ये किमान चार तज्ज्ञ असलेली 2,170 पथके देशातील 723 जिल्ह्यांतील 65,000 गावांना भेट देतील. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मृदा आरोग्य, हवामान, पाणी उपलब्धता आणि पर्जन्यवृष्टीचा कल यावर आधारित मार्गदर्शन करण्यात येईल. मृदा आरोग्य कार्डांचा वापर करून, योग्य पिके, बी-बियाण्यांच्या जाती, खतांचा संतुलित वापर आणि उत्पादनखर्च कमी करण्याच्या शिफारसी दिल्या जातील.

या अभियानाची रचना शेतकरी संवादात्मक आणि भागीदारीच्या स्वरुपाची आहे. प्रत्येक गावात तीन सत्रांमध्ये (सकाळ, दुपार, सायंकाळ) चर्चा होणार असून, शेतकरी त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या समस्यांबद्दल माहिती देतील आणि थेट प्रश्न विचारतील. यामुळे भविष्यातील संशोधनासाठी दिशा मिळणार आहे.

या उपक्रमात 113 आयसीएआर संस्था, 731 कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, एफपीओ आणि नवोन्मेषी शेतकरी सहभागी होणार आहेत. सुमारे 16,000 कृषी वैज्ञानिकांचे ज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे.

अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शास्त्र, तंत्रज्ञान आणि अनुभवाचा संगम, ज्याद्वारे भारताला “जगाची अन्नटोपली” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. 1.3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असलेल्या या अभियानामुळे भारतातील शेतीत सतत सुधारणा, शाश्वत उत्पादन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकास घडेल, असा सरकारचा विश्वास आहे.