
Soyabin bajarbhav : जून २०२५ मध्ये सोयाबीनचे बाजारभाव मागील वर्षींच्या तुलनेत तुलनेने कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील उत्पादनात काही प्रमाणात वाढ असून, जागतिक स्तरावर अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना यासारख्या प्रमुख देशांतून उत्पादनात वाढ झाल्याचे USDA च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढल्याने किमतींवर दबाव आला आहे. विशेषतः २०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन सुमारे ४२६८ लाख टन इतके होणार असल्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षांच्या तुलनेत वाढीचा आहे.
भारतामध्येही २०२४-२५ मध्ये अंदाजे १२५.० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा सुरळीत राहील. मागील तीन वर्षांत जून महिन्याच्या सरासरी किमती अनुक्रमे ५१००, ४७०० आणि ४६०० रुपये प्रति क्विंटल इतक्या राहिल्या आहेत. सध्याच्या हंगामासाठी घोषित केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) ४६०० रुपये प्रति क्विंटल असून, अनेक बाजारपेठांमध्ये याच्यापेक्षा प्रत्यक्ष बाजारभाव कमी राहण्याची चिन्हे आहेत.
APMC बाजारातही किमतीत काहीशी घट दिसून येत आहे. मागणी स्थिर असली तरी पुरवठा आणि जागतिक बाजारातील स्पर्धेमुळे व्यापारी खरेदीसाठी दबावाने निर्णय घेत आहेत. सोयाबीनचा मोठा हिस्सा तेल व खाद्यउत्पादनासाठी वापरला जातो आणि या क्षेत्रातील मागणी काहीशी स्थिर राहिली आहे.
या सर्व घटकांचा विचार करता जून २०२५ मध्ये सोयाबीनचे बाजारभाव सुमारे ४२०० ते ४६०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी येण्याची शक्यता कमी असून, स्थानिक उत्पादनातील वाढ लक्षात घेता शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीच्या स्तरावर विक्रीचा विचार करावा, असा सल्ला दिला जात आहे. कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने ही माहिती दिली आहे.