Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास ‘ए ग्रेड’मानांकन…

Agricultural University

Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीने प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्रदान केले आहे. ही अधिस्वीकृती १ एप्रिल २०२३ पासून ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी पाच वर्षांसाठी देण्यात आली असून, विद्यापीठास ३.२१ गुण मिळाले आहेत. आयसीएआरच्या १६ मे २०२५ रोजी पार पडलेल्या ४०व्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

या मानांकनामध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जा, संशोधनातील सातत्य, विस्तार सेवा आणि भौतिक सुविधा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. अधिस्वीकृती समितीने २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान परभणीसह लातूर, बदनापूर, अंबाजोगाई, धाराशिव, गोळेगाव आणि चाकूर येथील उपकेंद्रांना भेटी दिल्या. त्या वेळी महाविद्यालयांनी आपले कार्य सादर करताना, शैक्षणिक प्रगती, शेतकरी हिताच्या उपक्रमांतील सहभाग आणि भौतिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर यांची ठळक नोंद झाली.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात संपूर्ण विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे केलेल्या कामगिरीचे हे फळ असून, त्यांनी यशाचे श्रेय सर्व विद्यापीठ समुदायाला दिले आहे. त्यांच्याच दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे मराठवाड्यातील कृषि शिक्षणाला नवसंजीवनी मिळाली आहे. विशेषतः कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या शाखांतील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमांनी राष्ट्रीय निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या मानांकनामुळे विद्यापीठात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. हे मानांकन शैक्षणिक विश्वासार्हतेला बळकटी देणारे असून, नव्या विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षणाची आश्वासक दिशा दाखवणारे ठरणार आहे. आता विद्यापीठ विद्यार्थी, शेतकरी आणि संशोधन या तिन्ही स्तरांवर अधिक जबाबदारीने आणि गुणवत्ता केंद्रित दृष्टिकोनाने कार्यरत राहणार आहे.