kanda bajar bhav : नाफेड कांदा खरेदीचा दर वाढला; या आठवड्याचा बाजारभाव जाणून घ्या…

kanda bajarbhav : नाफेड आणि एनसीसीएफने अजूनही कांदा खरेदीला सुरूवात केली नसली, तरी दोन आठवड्यापूर्वीत नाफेडची प्रायोगिक तत्वावर कांदा खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ज्या संस्थांना खरेदीचे काम देण्यात आले, त्यांच्याकडून कागदपत्रांची आणि अटी व शर्तींची पूर्तता करून घेण्याचे काम या आठवड्यापर्यंत सुरूच असल्याने ही खरेदी लांबली असल्याचे समजते.

दरम्यान असे असले तरी नाफेडने कांदा खरेदीचे बाजारभाव दोन आठवड्यापासून जाहीर करायला सुरूवात केली होती. त्यानुसार ९ जून रोजी सुरू झालेल्य आठड्यात नाफेडचा कांदा बाजारभाव १४३५ रुपये प्रति क्विंटल होता. त्यानंतर दोनच दिवसात नाफेडसाठी नवा खरेदी दर १५१० रुपये आणि त्यानंतर शेवटचा दर म्हणजेच २१ जून रोजीचा १६९० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला.

आता या आठवड्यात म्हणजेच शनिवार दिनांक २८ जून रोजीचा नाफेड-एनसीसीएफचा ताजा खरेदी दर प्रति क्विंटलसाठी १६६५ रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यंतरी नाफेड आणि एनसीसीएफच्या दरावरून अनेक माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्या सुरूवातीच्या म्हणजेच ९ जूनच्या दराच्या होत्या. या माध्यमांनी नंतरचे बाजारभाव जाहीर केले नाही. तसेच नाफेडची खरेदीही लांबली परिणामी कांदा बाजारभाव काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीचा घोळ अजूनही संपायला तयार नाही, असे असले, तरी येत्या सोमवारपासून म्हणजेच ३० जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.