Onion export : बांग्लादेश कांदा निर्यातीसंदर्भात उलटसुलट बातम्यांमुळे शेतकरी गोंधळात..


Onion export :  मागील आठ दिवसांपासून राज्यातील काही बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर १०० ते ३०० रुपयांनी घसरले आहेत. या आठवड्यात सोमवारी कांदा लिलाव सुरू झाले तेव्हा लासलगाव बाजारसमितीमध्ये सरासरी १५०० रुपये आणि जास्तीत जास्त २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याला मिळत आहे. इतर बाजारसमित्यांमध्येही सरासरी १२०० ते १५०० रुपये असा दर असून मागच्या आठवड्याच्या तुलनेत राज्याच्या सरासरी दरात थोडीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर बांग्लादेशात कांदा निर्यात सुरू झाली तर कांद्याचे त्यातही गोल्टी व मीडियम आकाराच्या कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ही निर्यात कधी सुरू होईल याबाबत विचारत आहे. सध्या सोशल मीडियासह काही पोर्टल आणि माध्यमांमध्ये निर्यात सुरू होण्याबाबत उलटसुलट बातम्या येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम वाढत आहे. मात्र शेतकऱ्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि अवलंबून राहू नये असा सल्ला देण्यात येत आहे.

कांदा निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी २४ ला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार बांग्लादेशात कांदा निर्यात करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील काही निर्यातदारांनी तयारी सुरू केली असून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा बांग्लादेशात ३० टक्के कांदा जास्त झाल्याने या देशाकडून मे किंवा जूनमध्ये मागणी आलेली नाही. मात्र आता तेथील कांदा संपत आला असून बाजारभाव वाढत आहे.

जुलैच्या मध्यावर बांग्लादेशात कांदा मागणी वाढणार असून त्यांना आयातीशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी ते भारत, पाकिस्तान किंवा चीनकडून कांदा आयात करू शकतात. सध्या भारताचे दर पाकिस्तान आणि चीनपेक्षा जास्त असल्याने बांग्लादेश त्या देशांतील कांद्याला पसंती देऊ शकतो असेही या पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

सीमा उघडली पण
दरम्यान भारतर आणि बांग्लादेशातील तणावामुळे बांग्लादेश आणि भारताच्या सीमा बंद होत्या. त्या अलिकडेच म्हणजे २९जूनच्या आसपास बांग्लादेशने खुल्या केल्या असून सध्या हळद, आले यासारख्या मसाल्याच्या पदार्थाची अगदी कमी प्रमाणात निर्यात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी बांग्लादेशाने तेथील कांदा व्यापारी किंवा कांदा आयातदारांना आयपी (import permission) आयात परवाना दिलेला नाही. हा परवाना नसल्याने बांग्लादेशच्या व्यापाऱ्यांना कांदा आयात करण्यात अडचण होत असून हा परवाना कदाचित येत्या आठ दिवसात मिळेल अशी शक्यता भारतातील निर्यातदारांना वाटत आहे.

असे असले तरी एकूणच सर्व गोष्टी जर आणि तर च्या असल्याने शेतकऱ्यांनी बांग्लादेशाच्या निर्यातीची आणि भाववाढीची वाट न पाहाता कांदा साठवायचा की विकायचा हा निर्णय आपल्या आवश्यकतेनुसार आणि स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.