Sowing of crops : एकच यंत्र करेल अनेक पिकांची पेरणी; न्यूमॅटिक प्लांटर बद्दल जाणून घ्या..

Sowing of crops : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अत्याधुनिक पेरणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राचे नाव न्यूमॅटिक प्लांटर असून याचा वापर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात प्रात्यक्षिकातून सुरू करण्यात आला आहे.

हे यंत्र मल्टीक्रॉप म्हणजेच अनेक पिकांची पेरणी एकाच यंत्रातून करू शकते. यात विशेष प्रकारच्या प्लेट्स लावून कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, मूग, उडीद, तुर, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांची अचूक पेरणी करता येते. हे यंत्र सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून घेण्यात आले आहे.

या यंत्राचा मुख्य फायदा म्हणजे बियाण्यांची अचूक टाकणी होते. एकेक बियाणे योग्य अंतर ठेवून मातीमध्ये टाकले जाते. त्यामुळे बियाण्यांची बचत होते, पेरणीला लागणारा वेळ कमी लागतो आणि उत्पादनात वाढ होते. पिकांची उगवणही चांगली होते आणि पीक एकसंधपणे वाढते.

हे यंत्र वापरल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत, वेळ आणि खर्च कमी होतो. हे यंत्र पेरणी अधिक काटेकोर व वैज्ञानिक पद्धतीने करते. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर होण्यास मदत होते.

या यंत्राची माहिती, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर चालकांना यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे यंत्र वापरावे यासाठी विद्यापीठ विविध गावांमध्ये प्रात्यक्षिके घेणार आहे.

नवीन यंत्र आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अधिक अचूक, कमी खर्चाची आणि जास्त उत्पादन देणारी होईल, असा विद्यापीठाचा विश्वास आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त साधन ठरणार आहे.