
Onion purchase : केंद्राची नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २८ जुलै रोजी थांबणार असल्याने, यानंतर कांद्याचे दर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप किसान मोर्चाने आता सत्ताधारी भाजप सरकारलाच प्रश्न विचारत कांदा खरेदीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र अमृतकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिले आहे.
यावर्षी राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांच्या चाळी कांद्याने भरल्या असून, मागील वर्षापेक्षा २० ते ३० टक्के जास्त उत्पादन झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील कांदा त्याच्या चांगल्या टिकवण क्षमतेमुळे ओळखला जातो. मात्र, सध्या केंद्राची खरेदी सुरू असूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये यंदा कांद्यासाठी चांगले हवामान असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. याशिवाय, लवकरच मध्य प्रदेशातूनही कांदा बाजारात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी दक्षिणेत जास्त पावसामुळे कांद्याचे नुकसान होते आणि नाशिकच्या कांद्याला भाव मिळतो, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेच्या लाटेमुळे शेतकऱ्यांच्या चाळींमधील कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही बराच कांदा शिल्लक आहे, परंतु उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी तफावत आहे. व्यापाऱ्यांनीही फारसा कांदा साठवलेला नाही, असे निरीक्षण अमृतकर यांनी मांडले आहे.
या सर्व परिस्थितीमुळे राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी, २८ जुलै रोजी संपणारी कांदा खरेदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी भाजपनेच आपल्याच सरकारकडे केली आहे. ही खरेदी बंद झाल्यास कांद्याचे भाव कोसळतील आणि शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही भाजप किसान मोर्चाने दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार केंद्राकडे याबाबत मुदतवाढीची विनंती करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.11:05 AM