Rabi seed sales : १७ सप्टेंबरपासून रबी बियाणे विक्री सुरू परभणी विद्यापीठाची शेतकऱ्यांसाठी खास योजना..

Rabi seed sales : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १७ सप्टेंबरपासून रबी हंगामासाठी विकसित केलेल्या दर्जेदार बियाण्यांची विक्री सुरू होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रबी पीक परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्यात होणार असून, शेतकऱ्यांना विविध वाणांचे बियाणे मर्यादित दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विद्यापीठाने यंदा हरभरा, ज्वारी, करडई, गहू आणि जवस या पिकांचे एकूण ३९४.५० क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. यामध्ये हरभऱ्याचे बीडीएनजीके ७९७ वाणाचे १० किलोचे पॅक ८०० रुपयांना, तर काबुली बीडीएनजीके ७९८ वाणाचे १० किलोचे पॅक १००० रुपयांना मिळणार आहेत. करडईच्या पीबीएनएस १२ (परभणी कुसुम) आणि पीबीएनएस ८६ (पूर्णा) वाणांची ५ किलोची बॅग ५०० रुपये दराने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

ज्वारीच्या परभणी मोती, परभणी ज्योती आणि सुपर मोती या वाणांची प्रति बॅग किंमत ३२० रुपये असून, एका शेतकऱ्याला चार बॅग मिळणार आहेत. गव्हाच्या ‘समाधान’ वाणाचे ८४.२० क्विंटल बियाणे उपलब्ध असून, जवसाच्या एलएसएल ९३ वाणाची ५ किलोची बॅग ५०० रुपयांना मिळणार आहे. याशिवाय, २ किलोची बॅग २६० रुपये आणि ५ किलोची बॅग ६५० रुपये दरानेही उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी परभणीसह छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंबेजोगाई, नांदेड, तुळजापूर आणि खामगाव येथील विद्यापीठ विक्री केंद्रांवरही बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना परभणीला येण्याची गरज भासणार नाही. दरवर्षी हंगामात बियाण्यांची टंचाई जाणवत असते, मात्र यंदा विद्यापीठाकडूनच थेट पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे.

या परिसंवादात रबी पिकांची लागवड, कीड-रोग व्यवस्थापन, आणि उत्पादनवाढीच्या उपायांवर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात देशभरातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.