कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या पिकाला सुपर फूड मानले जाते. हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे.
महेंद्र अजीनाथ बारस्कर (रा. वाघा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे या ३९ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. बारस्कर यांचे शिक्षण दहावी नापास आहे. त्यांनी लावलेल्या पिकाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे. भारतात उच्चांकी दर मिळणाऱ्या या पीक लागवडीचा त्यांनी प्रयोग यशस्वी केला आहे. हे खरीप हंगामात येणारे पीक आहे. १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पिकाची लागवड केली जाते.
उग्र वासामुळे जनावरे देखील या पिकाला तोंड लावत नाहीत. या पिकाला कोणत्याही रासायनिक खताची अथवा फवारणीची गरज नाही. Chia Seeds हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. रात्री २ ते ३ ग्रॅम चिया पाण्यात भिजवून सकाळी हे खाल्ल्यास याचा फायदा होतो.
रक्तदाब, वजन कमी करणे, मधुमेह, हाडे मजबूत आदी आरोग्यदायी जीवनासाठी चियाचा उपयोग होतो. लागवडीपासून १२० दिवसांत हे पीक तोडणीसाठी तयार होते. तुळशीला येणाऱ्या मंजिरीप्रमाणे हे पीक आहे. लागवडीसाठी हलकी, भारी कोणतीही जमीन उपयुक्त आहे. कमी पाण्यात अगदी एक महिना हे पीक पाण्याशिवाय उभे राहते.
या पिकाची एकरी पाच क्विंटल उत्पादन क्षमता आहे. मात्र, बारस्कर यांनी सेंद्रिय आणि शेण खताच्या वापरामुळे एकरी १० क्विंटल उत्पादन काढले आहे.
source:- krushivasant