The new power of AI : जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने भारतातील डिजिटल आणि तांत्रिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आरोग्य, शेती, शिक्षण आणि शाश्वत शहरे या क्षेत्रांमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी 8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी देण्यात येणार असून, आरोग्य क्षेत्रातील मॉडेलच्या विकासासाठी अतिरिक्त 400,000 अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, भारतीय भाषांवर आधारित तांत्रिक उपाय विकसित करणाऱ्या Gyani.ai, Corover.ai आणि Bharatzen या स्टार्टअप्सना प्रत्येकी 50,000 अमेरिकन डॉलर्सचे अनुदान देऊन स्थानिक नवकल्पना आणि समावेशक तंत्रज्ञानाला चालना देण्याचा गुगलचा प्रयत्न स्पष्ट होतो.
गुगलने भारतातील एआय इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी आरोग्य आणि शेती क्षेत्रावर विशेष भर देत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जाहीर केली आहे. बहुभाषिक एआय-आधारित अनुप्रयोगांना चालना देण्यासाठी वाधवानी एआयला 4.5 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला जाणार असून, मेडगेम्माच्या माध्यमातून भारतासाठी आरोग्य मॉडेल विकसित करण्यासाठी 4 लाख डॉलर्सची अतिरिक्त मदतही जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य, शेती, शिक्षण आणि शाश्वत शहरांसाठी भारतातील एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्सला 8 दशलक्ष डॉलर्सचा निधी देण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे विशेषतः शेती आणि आरोग्य क्षेत्रात उत्पादकता, कार्यक्षमता आणि नवकल्पनांना चालना मिळत असून, या गुंतवणुकीमुळे दीर्घकालीन सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे.
भारताच्या आरोग्य आणि एआय संशोधन क्षेत्राला चालना देण्यासाठी गुगलने एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) सोबत सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत त्वचाविज्ञान आणि बाह्यरुग्ण उपचारांसाठी भारत-विशिष्ट एआय मॉडेल्स विकसित करण्यात येणार असून, आयआयएससीमधील संशोधक, एआय तज्ञ आणि क्लिनिशियन व्यापक क्लिनिकल अनुप्रयोगांसाठी एआयच्या वापराचा अभ्यास करणार आहेत. तसेच, समावेशक एआय अजेंडा पुढे नेत गुगलने आयआयटी मुंबई येथे भारतीय भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे प्रारंभिक योगदान जाहीर केले आहे. या उपक्रमांमुळे भारताच्या भाषिक विविधतेनुसार तंत्रज्ञान विकासाला गती मिळून देशाच्या एआय इकोसिस्टमला मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.












