Sugarcane crushing : राज्यातील साखर हंगामाने वेग घेतला असून अवघ्या दोन महिन्यांत १९५ साखर कारखान्यांमधून ५६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने ९३ लाख मेट्रिक टन गाळप करत राज्यात आघाडी घेत पुणे व कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांना मागे टाकले आहे. ऊस क्षेत्र वाढ, सक्षम तोडणी-वाहतूक व्यवस्था आणि कारखान्यांची पूर्ण क्षमतेने सुरू असलेली कामगिरी यामुळे गाळपाचा वेग वाढला असला, तरी सोलापूर जिल्हा साखर उताऱ्याच्या बाबतीत मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे असल्याचे चित्र दिसून येते.
३३ कारखान्यांत ५६२ मे. टन गाळप
◼️ सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखान्यांमधून एकूण ५६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
◼️ ओंकार (जुना मातोश्री लक्ष्मी शुगर), गोकुळ धोत्री व लोकशक्ती हे कारखाने सुरू असले तरी त्यांची अधिकृत गाळप नोंद झालेली नाही.
◼️ सोलापूरनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ७६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
◼️ पुणे जिल्ह्यात ६५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची नोंद आहे.
◼️ अहिल्यानगर जिल्ह्यात ६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
◼️ साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा १०.५ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
◼️ सांगली जिल्ह्याचा साखर उतारा १०.४ टक्के आहे.
◼️ सातारा जिल्ह्याचा साखर उतारा ९.१५ टक्के नोंदवला आहे.
◼️ पुणे जिल्ह्याचा साखर उतारा ८.८९ टक्के आहे.
◼️ सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा ८.२५ टक्के आहे.
◼️ अहिल्यानगर जिल्ह्याचा साखर उतारा ८.१२ टक्के इतका आहे.












