आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बोगस बियाणे, खते, बोगस कीटकनाशके बाजारात येऊ नयेत यासाठी तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पाटील बोलत होते.
एल निनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणांची उपलब्धता राखीव ठेवावी, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जेथे तक्रारी आल्या तेथे तत्काळ चौकशी, अहवाल व गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील म्हणाले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे.
ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच फवारणीसाठी विविध कार्यकारी संस्थांना अनुदानावर ड्रोन मशिन उपलब्ध करून देता येतील. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतात मागणीनुसार तेथून फवारणी करता येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या महत्त्वाकांक्षी सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, असे पाटील म्हणाले.
पडीक जमिनीवर बांबू लागवड उपक्रम
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला आहे. जास्तीत जास्त प्रचार करून त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्या, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडणी, धरण प्रकल्पातील पाणी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मार्च 2023 अखेर कृषी पंपांच्या वीज जोडण्यांचे काम प्राधान्याने पूर्ण केले असून, यावर्षी जिल्ह्यात 10 हजार वीज जोडण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरली आहे, त्यांना तीन महिन्यांनी वीज जोडणी देण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
source:- krishijagran