आंबेगाव तालुक्यामधील अनेक शेतकरी बेबी कॉन मका बी लागवडीकडे वळले आहे. अतिशय कमी पाण्यावर व स्वस्तात तसेच कमी खर्चात असणारे पीक म्हणून बेबीकॉर्न पिकाकडे पाहिले जाते. दुभत्या जनावरांना सकस आहार यापासून मिळतो ,दूध उत्पादनात वाढ होते . त्यामुळे बाराही महिने येथील शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहतो .
शेतकरी कंपन्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग (हमीदराने) करून बेबी कॉर्न लागवडीचा कल मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या भागातील शेतकऱ्याबरोबर पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्या कॉन्टॅक्ट फार्मिंग करतात. म्हणजेच विकत घेण्याची हमी घेतात व शेतीशी निगडित अर्थकारणाचा समतोल ठेवण्यात मदत करतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेल्या विविध कंपन्या या भागातील शेतकऱ्यांना बेबी कॉर्नचे मका बी आठशे रुपये किलो या दराने देतात.
कंपन्या येथील शेतकऱ्यांना लागवडीनंतरही वेळोवेळी मार्गदर्शनही करतात. एकरी चार किलो बी या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यात येते . लागवड पूर्ण झाल्यानंतर जवळपास पावणेतीन महिन्यामध्ये मका पिकाची कोवळी कणसे (बेबी कॉर्न) आठ रुपये किलो दराने कंपन्या स्वतः तोडून घेऊन जातात.
यात कुठलेही टेंशन नसल्यामुळे शेतकरी राजीखुशी तयार होतात व बेबी कॉर्न चा दिवसाआड तोडा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोवळी कणसे तोडली जातात. बेबी कॉर्नला किलोला आठ रुपये भाव मिळतो . त्यामुळे बियाचे पैसे वसूल होऊन बाऱ्यापैकी नफा येथील शेतकऱ्यांना या पिकातुन मिळतो .
दुभत्या जनावरांना मिळतोय चारा
मुख्यतः या कंपन्या फ्रोजन फुड बनवणाऱ्या उद्योगात असतात. तसेच काही हॉटेलमध्ये तसेच रेस्टॉरंट व मसाले उद्योगामध्ये ग्रेव्ही बनवणाऱ्या कंपन्यांना माल विकला जातो. फक्त बेबी कॉर्न (कोवळी कणसे) कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेल्या कंपन्या नेत असल्यामुळे शेतकऱ्यांना आठ ते दहा फूट वाढलेल्या मका पिकाच्या ताटापासून मुरघास तयार करू शकतात .
येथील शेतकऱ्यांनी मुरघास बनवण्याचे तंत्रज्ञान अवलंबल्यामुळे या मका पिकापासून येथील शेतकरी सहा ते आठ महिने टिकेल असा मुरघास तयार करतात. अशाप्रकारे दुहेरी फायदा मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या दुखत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला जातो .
दुभत्या जनावरांसाठी हा चारा सकस आहार आहे त्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहते. दुभती जनावरे निरोगी राहण्यास मदत होते . मुरघासामुळे दुभत्या जनावरांना सकस आहार मिळतो. यामुळे दूध उत्पादनात वाढ होते . दुधातील फॅटचे प्रमाण वाढते.