सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड बघून किटकनाशकाची फवारणी करावी अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे. तज्ज्ञांनी आठवड्यासाठी पुढीलप्रमाणे पीक व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे.
कापूस
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.
तूर
ढगाळ वातावरणामूळे तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी द्यावा.
बागायती गहू
बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. गहू पिकाची पेरणी करून 21 दिवस झाले असल्यास गहू पिकास हलके पाणी द्यावे.
मका
वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी मका पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी.