
Crop damage : राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात तब्बल ४.५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, हजारो शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत. यवतमाळ, नांदेड, वर्धा, बीड आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यातील १२०० गावांचा संपर्क तुटला असून, ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणीच पाणी झाले आहे. जायकवाडी आणि पैनगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने तातडीने पंचनामे सुरू केले असून, ३६८ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. हिंगोलीसाठी ३६० लाख, नांदेडसाठी १०७६ लाख, अकोलासाठी ४०५ लाख, तर बुलढाण्यासाठी तब्बल ७४४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निधी वितरणाचे आदेश दिले आहेत.
शेतकरी संघटनांनी सरकारकडे दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली आहे. “दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे शेती संकटात सापडते. केवळ तात्कालिक मदत नव्हे, तर हवामान बदलाशी लढण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावीत,” अशी मागणी शेतकरी नेते अण्णा पाटील यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी हवामान-प्रतिरोधक पिके, जलसंधारण आणि तंत्रज्ञानाधारित शेतीवर भर देण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही, तर शाश्वत शेती धोरणांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.