
Gram market prices : जून २०२५ मध्ये हरभऱ्याचे बाजारभाव मागील वर्षींच्या तुलनेत काहीसे नरम राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पीक असलेल्या हरभऱ्याचे देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून, त्याचा पुरवठा चांगला राहिला आहे. त्यामुळे किमतींवर दबाव जाणवत आहे.
भारत सरकारने २०२४-२५ साठी हरभऱ्याच्या उत्पादनाचे लक्ष्य सुमारे ११५ लाख टन जाहीर केले असून, प्रत्यक्ष उत्पादनही त्याच्याजवळपास पोहोचले आहे. मागणी स्थिर असली तरी बाजारात मोठा साठा असल्यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग हे सशंकतेने व्यवहार करत आहेत.
हरभऱ्याचे उपयोग प्रामुख्याने डाळ, बेसन उत्पादनासाठी होतो. मात्र मागणी स्थिर असून, साठा वाढल्यामुळे किमतीत काहीशी घसरण झाली आहे. मागील तीन वर्षांत जून महिन्याच्या सरासरी किमती ५००० ते ६९९० रुपये प्रति क्विंटल दरम्यान होत्या. यंदा ही किंमत सुमारे ५५०० रुपये इतकी राहण्याची शक्यता आहे.
किमान आधारभूत किंमत (MSP) ५४४० रुपये प्रति क्विंटल असून, बाजारभाव याच्याभोवती राहण्याचा अंदाज आहे. निर्यातीसाठी स्पर्धा वाढल्यामुळे जागतिक बाजारातही भारताला मोठा फायदा होताना दिसत नाही.
.एकूण स्थिती पाहता, शेतकऱ्यांनी साठवणूक आणि विक्रीचे नियोजन काळजीपूर्वक करावे. उत्पादन जास्त असल्याने बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता सध्या तरी नाही. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाने दिलेल्या अहवालानुसार, जून २०२५ मध्ये FAQ ग्रेड हरभऱ्याचे सरासरी संभाव्य बाजारभाव ५५०० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहील, असे नमूद आहे. मागील वर्षी जून महिन्यात सरासरी ६९९०, २०२३ मध्ये ६५००, आणि २०२२ मध्ये ६१०० इतकी होती. यंदा साठा अधिक असल्यामुळे दर काहीसे घसरणीकडे झुकू शकतात.